डॉक्टरांचा संप कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:34 AM2018-05-22T01:34:31+5:302018-05-22T01:34:31+5:30
सोमवारी सकाळपासून जे.जे. रुग्णालयातील बाह्यरुग्णसेवेवर संपाचा तीव्र परिणाम दिसून आला.
मुंबई : सर जे. जे. रुग्णालयात दोन निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सुरू असलेला संप तिसऱ्या दिवशीही कायम आहे. या संपात सरकारी रुग्णालयांसह आता पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी उडी घेतली आहे. केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये सुरक्षा रक्षकाची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, या भूमिकेवर निवासी डॉक्टर ठाम आहेत.
संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी निवासी डॉक्टरांसोबत बैठक घेतली. या बैठकीत निवासी डॉक्टर्स, जे. जे. अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर हे उपस्थित होते. या बैठकीबाबत ‘लोकमत’ला अधिक माहिती देताना सेंट्रल मार्डचे डॉ. अमोल हेकरे यांनी सांगितले की, बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. सुरक्षेबाबतची उपाययोजना करण्याबाबत मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.
ग्राउंड लेव्हलला आश्वासनांची पूर्तता होण्यासाठी अधिकाºयांसोबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र, प्रत्येक वॉर्डमध्ये सुरक्षा रक्षकाची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही. जे.जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले की, कोणत्याही रुग्णाला उपचाराशिवाय परत जावे लागू नये, याकरिता आपत्कालीन नियोजन करण्यात आले आहे.
बाह्यरुग्णसेवेला फटका
सोमवारी सकाळपासून जे.जे. रुग्णालयातील बाह्यरुग्णसेवेवर संपाचा तीव्र परिणाम दिसून आला. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत २,५१२
रुग्णांना तपासण्यात आले, फक्त २२ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात
आले.
जे.जे.मध्ये अतिरिक्त सुरक्षा
रात्री उशिरापर्यंत निवासी डॉक्टरांसोबत झालेल्या बैठकीत जे.जे.मध्ये २५ अतिरिक्त सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. मंगळवारपासूनच त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, तरीही संप मागे घेण्यापूर्वी मंगळवारी याबाबत पुन्हा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आले.