रेल्वे अपघातात तुटलेला हात पालिका डॉक्टरांनी जोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 02:56 AM2019-06-15T02:56:21+5:302019-06-15T02:56:43+5:30
वैयक्तिक कामासाठी गुजरातमधून मुंबईत आलेला २८ वर्षीय धर्मेंद्र महिनाभरापूर्वी रात्रीच्या सुमारास अंधेरी स्टेशनवर रेल्वेतून पाय घसरून खाली पडला
मुंबई : रेल्वेतून पडल्यामुळे उजव्या दंडापासून वेगळा झालेला २८ वर्षीय तरुणाचा हात वाचविण्यात महापालिकेच्या डॉक्टरांना यश आले आहे. अपघातानंतर काही तासांतच शस्त्रक्रिया करून कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी उजवा हात दंडाशी जोडला होता. महिनाभराच्या उपचारानंतर त्या हाताने हालचाल करणे तरुणाला शक्य झाले आहे.
वैयक्तिक कामासाठी गुजरातमधून मुंबईत आलेला २८ वर्षीय धर्मेंद्र महिनाभरापूर्वी रात्रीच्या सुमारास अंधेरी स्टेशनवर रेल्वेतून पाय घसरून खाली पडला. यात त्याचा उजवा हात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने दंडापासून निखळला. त्याच्या मित्राने प्रसंगावधान राखून हात सुरक्षित प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवला. कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर लगेचच उपचार सुरू करून मध्यरात्री १ वाजता शस्त्रक्रिया सुरू केली. सात तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर तुटलेला उजवा हात उजव्या हाताच्या दंडाशी जोडला गेला. महिन्याभराच्या उपचारानंतर धर्मेंद्रच्या हातात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. विवाहित धर्मेंद्रला तीन मुले आहेत. उदरनिर्वाहासाठी तो अहमदाबादमध्ये रोजंदारीवर काम करतो.
अपघातानंतर प्रत्येक क्षण मोलाचा
अशा प्रकारच्या अपघातात हात, पाय यासारखा एखादा बाह्य अवयव तुटल्यास, त्याचा रक्तप्रवाह थांबून अवयव निकामी होण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू होते. त्यामुळे अशा परिस्थितीत संबंधित रुग्णावर उपचार करताना प्रत्येक क्षण अत्यंत मोलाचा असतो व आवश्यक उपचार वेळेत होणे गरजेचे असते, असे कूपर रुग्णालयांतील प्लॅस्टिक सर्जन डॉ. नितीन घाग यांनी सांगितले.
पायाच्या पंजावरही यशस्वी शस्त्रक्रिया
गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात सुतारकाम करणाऱ्या तरुणाच्या पायाचा पंजा करवतीने कापला गेला होता. मूळचा आसाममधील असलेला आणि उदरनिर्वाहसाठी मुंबईत आलेल्या या तरुणावरदेखील कूपर रुग्णालयातच डॉ. घाग व त्यांच्या चमूने यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या उजव्या पायाचा पंजा जोडला. हा तरुण आठ महिन्यांच्या उपचारानंतर आता स्वत:च्या पायावर पुन्हा उभा राहिला आहे.
अशी पार पडली अवघड शस्त्रक्रिया : डॉ. नितीन घाग यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली. मध्यरात्री १ वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया ७ तासांनी म्हणजेच सकाळी ८ वाजताच्या सुमारास संपली. शस्त्रक्रिया करणाºया चमूमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार ग्वालानी, डॉ. नैना दळवी, डॉ. अपेक्षा गाला व डॉ. निहारिका चौधरी यांचा समावेश होता. महिन्याभराच्या उपचारानंतर धर्मेंद्रचा संवेदनाहीन झालेला हात आता पूर्वपदावर येत असून सकारात्मक प्रतिसाद देऊ लागला आहे. पुढील वर्षभरात धर्मेंद्रचा उजवा हात पुन्हा पूर्ववत होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.