Join us

स्वत:च्या आजाराबाबत डॉक्टर अनभिज्ञ

By admin | Published: October 09, 2015 3:10 AM

गेल्या काही वर्षांपासून रुग्ण आणि डॉक्टरांमधील नातेसंबंधात आलेल्या व्यावसायिकतेमुळे डॉक्टरांवरचा ताण वाढला आहे. त्यातच डॉक्टरांच्या कामाच्या अनियमित वेळा, झोप न मिळणे

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून रुग्ण आणि डॉक्टरांमधील नातेसंबंधात आलेल्या व्यावसायिकतेमुळे डॉक्टरांवरचा ताण वाढला आहे. त्यातच डॉक्टरांच्या कामाच्या अनियमित वेळा, झोप न मिळणे याचा थेट परिणाम डॉक्टरांच्या आरोग्यावर होत आहे. तपासणी केलेल्या १०० पैकी ५५ डॉक्टरांना स्वत:च्या आजाराविषयी मात्र काहीच माहिती नसल्याचे उघड झाले. डॉक्टरांवरचा वाढता मानसिक ताण हे हृदयविकाराचे मुख्य कारण असल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले. वोक्हार्ट रुग्णालयाने जागतिक हृदयविकार दिनाच्या पार्श्वभूमीवर ४० ते ६० वयोगटातील १०० डॉक्टरांची तपासणी केली होती. या तपासणीनंतर २० डॉक्टरांना तत्काळ अ‍ॅन्जिओग्राफी करून घेण्याचा सल्ला दिला. तर १५ डॉक्टरांना उच्चकॉलेस्ट्रोलचा त्रास असल्याचे त्यांना पहिल्यांदाच कळले. २० डॉक्टरांना मधुमेह असल्याचे या तपासणीतून स्पष्ट झाले. म्हणजेच १०० पैकी ५५ डॉक्टरांना आपण स्वत: आजारी असल्याचे तपासणी केल्यावर समजले. डॉक्टरांना हृदयविकार जडण्याचे प्रमाण वाढत आहे. डॉक्टरांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. त्यांना अनेक तास काम करावे लागते. रात्री शांत झोप मिळत नाही. अनेकदा इमर्जन्सी आल्यावर अर्धवट झोपेतून उठून जावे लागते. त्यातच आता रुग्ण आणि डॉक्टरांमधल्या बदलत्या नातेसंबंधामुळे डॉक्टरांवरचा ताण वाढला आहे, असे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अनुप टाकसांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)