शिकाऊ डॉक्टरांसाठी पालिकेच्या पायघड्या
By admin | Published: July 2, 2014 12:52 AM2014-07-02T00:52:00+5:302014-07-02T00:52:00+5:30
पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील ३०० रुग्णखाटा शिकाऊ डॉक्टरांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
नवी मुंबई : पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील ३०० रुग्णखाटा शिकाऊ डॉक्टरांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापूर्वीच्या अनुभवाविषयी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रथम संदर्भ रुग्णालयातील ३०० रुग्णखाटा तेरणा वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रयोजनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आज सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. तीन वर्षासाठीचा हा प्रस्ताव असून प्रत्येक वर्षी मुदतवाढीविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. पालिकेस प्रत्येक वर्षी जवळपास ५४ लाख ७५ हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. या प्रस्तावाविषयी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माजी उपमहापौर भरत नखाते यांनी सांगितले की, रुग्णालयात डॉक्टर वेळेत येत नाहीत. शिस्त राहिलेली नाही. रुग्णांशी योग्य वर्तन केले जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.
काँगे्रस नगरसेवक नामदेव भगत यांनी सांगितले की, शिकावू डॉक्टरांनी सर्वांशी नीट वागले पाहिजे. शिस्तबद्धपणे काम करून रुग्णांना चांगली सुविधा दिली पाहिजे असे मत मांडले. विजयानंद माने यांनीही रूग्णालयाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. इतर नगरसेवकांनीही आरोग्य सुविधेचा बोजवारा उडत असल्याचे निदर्शनास आले. या प्रस्तावास शिवसेना व काँगे्रस नगरसेवकांनी विरोध केला. अखेर बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. उपमहापौर अशोक गावडे यांनी नगरसेवकांच्या सूचनांचा विचार करून रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.