दादर मधील घटना, शिवाजी पार्क पोलिसांकड़ून तपास सुरु
सीमकार्डसाठी डॉक्टरने तासाभरात गमावले १० लाख
दादरमधील घटना, शिवाजी पार्क पोलिसांकडून तपास सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सीमकार्ड ब्लॉक करण्याच्या नावाखाली दादरमधील ६४ वर्षीय डॉक्टरच्या खात्यातून १० लाख २२ हजार रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अवघ्या तासाभरात या रकमेवर हात साफ करण्यात आला. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
तक्रारदार दादर परिसरात पत्नीसोबत राहण्यास आहेत. २५ जून रोजी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशात कागदपत्रांअभावी त्यांचे बीएसएनएलचे सीमकार्ड ब्लॉक होणार असल्याचे नमूद हाेते. त्यांनी तत्काळ संबंधित संदेशातील ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधला. संबंधित कॉलधारकाने त्यांना कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळे कार्ड ब्लॉक होणार असल्याचे सांगितले तसेच एक लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगितली. त्यांनीही विश्वास ठेवून कार्ड बंद होऊ नये म्हणून लिंकमध्ये सर्व तपशील भरला. त्यानंतर तासाभराने बँकेतून आलेल्या कॉलने त्यांना धक्का बसला. त्यांच्या खात्यातून १० लाख २२ हजार रुपये काढण्यात आले हाेते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
......................................................................................................