डॉक्टर तीन महिने पगाराविना
By admin | Published: December 5, 2014 11:04 PM2014-12-05T23:04:25+5:302014-12-05T23:04:25+5:30
मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळत असलेल्या डॉक्टरांचे पगार गेल्या सप्टेंबर महिन्यापासून थकले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी पल्स पोलिओ अभियानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
विजय मांडे, कर्जत
शासनाने जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हास्तरावर रुग्णालयावर ठरवून दिली आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळत असलेल्या डॉक्टरांचे पगार गेल्या सप्टेंबर महिन्यापासून थकले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी पल्स पोलिओ अभियानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉक्टरांच्या या बहिष्काराच्या इशाऱ्यानंतर पुढील पाच दिवसात थकीत पगार काढले जातील, असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हुकूमचंद्र पाटोळे यांनी दिले आहे. मात्र जानेवारी महिन्यापर्यंत पगार न दिल्यास १८ जानेवारी रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी गट अ यांच्या जिल्हा कमिटीने घेतला आहे.
रायगड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रुग्णालय आहे. त्याचवेळी उप जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा मुख्यालये कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण नियोजन राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक सांभाळतात. जिल्ह्यात १५ तालुक्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्या आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी पाच-सहाच्या संख्येने उपकेंद्रे कार्यरत आहेत. अशाप्रकारे आरोग्य सेवा सांभाळण्याचे काम करणाऱ्या ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या १०२ डॉक्टर काम करीत आहेत. मनुष्यबळाचा अभाव असतानाही ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
मात्र गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेकडून या डॉक्टरांचा पगार अदा करण्यात आलेला नाही. राज्य राजपत्रित अधिकारी वर्ग अ यांच्या रायगड जिल्हा संघटनेने आता त्याबाबत कडक भूमिका घेताली आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ पाटील यांनी जिल्हा परिषदेने तत्काळ पगार काढावेत, अन्यथा जिल्ह्यातील सर्व ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर जानेवारी महिन्यात देशपातळीवर होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या कामावर बहिष्कार टाकणार आहेत, तसा लेखी इशारा संघटनेने जिल्हा परिषदेला दिला आहे.
१८ जानेवारीला पल्स पोलिओ मोहीम असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी बहिष्कार टाकल्यास बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
आहे.