मुंबई : बऱ्याचदा रुग्णालय, दवाखान्यांमध्ये डॉक्टर व रुग्णांमध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटना घडताना दिसतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडियाने एका खटल्याच्या पार्श्वभूमीवर आता नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.मेडिकल काऊन्सिलच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये रुग्णांची काळजी ही डॉक्टरांची नैतिक जबाबदारी आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील लैंगिक संबंध घातक ठरतात. डॉक्टरांवरील विश्वासाला तडा जातो. रुग्णांसोबतच्या संबंधांचा वापर स्वत:साठी, व्यापार, लैंगिक समाधानासाठी करू नये, असे या मार्गदर्शक तत्त्वात नमूद आहे. यात रुग्णांची सुरक्षा लक्षात घेतली आहे. उपचारादरम्यान रुग्णाला बेशुद्ध करण्याची गरज असेल तर नर्स तेथे असावी, याचाही यात समावेश आहे.याविषयी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले की, मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडियाची यापूर्वीही डॉक्टर व रुग्ण यांच्या वागणुकीसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे होती. आता केवळ ती अद्ययावत केली असून यात डॉक्टर व रुग्णाचे नाते पवित्र असले पाहिजे, असे म्हटले आहे. समस्येने आणि आजारपणाने ग्रासलेल्या रुग्णाशी त्याच्या परिस्थितीचा डॉक्टरने फायदा घेऊन चुकीचे वागणे हा गैरप्रकार आहे.
डॉक्टर-रुग्ण संबंध होणार अधिक ‘हेल्दी’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 5:48 AM