ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन डॉक्टर महिलेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:06 AM2021-03-25T04:06:23+5:302021-03-25T04:06:23+5:30
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; मर्सिडीज, १४० तोळे सोन्यासह अडीच कोटींची लूट मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुलगा ...
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; मर्सिडीज, १४० तोळे सोन्यासह अडीच कोटींची लूट
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलगा आजारी असल्याचे सांगून डॉक्टर महिलेला घरी बोलावून ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार करण्यात आला. त्यानंतर बलात्काराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन गेल्या सहा वर्षांत तिच्यासह तिच्या बहिणीकडून मर्सिडीजसह तीन कार, १४० तोळे सोन्यासह अडीच कोटी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडा परिसरात उघडकीस आला. नागपाडा पोलिसांनी या प्रकरणी सय्यद युसुफजमाल शमविल (४७) विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
वरळी परिसरात तक्रारदार ४१ वर्षीय डॉक्टर नेहा (नावात बदल) राहण्यास आहेत. २०१४ मध्ये पतीविरुद्ध सुरू असलेल्या तक्रारीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात ये-जा करत असताना, त्यांची सय्यदसोबत ओळख झाली. सय्यद हा नागपाडा येथील डिमटीकर रोड परिसरात राहण्यास आहे. याच ओळखीतून २०१४ मध्ये सय्यदने मुलाची तब्येत ठीक नसल्याचे सांगून नेहा यांना घरी बोलावले. त्यानंतर ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. त्या शुद्धीवर आल्यानंतर बलात्काराचा काढलेला व्हिडिओ आणि फाेटाे सोशल मीडियासह नातेवाइकांकडे व्हायरल करण्याची धमकी दिली. ब्लॅकमेल करीत पैसे, दागिन्यांची मागणी सुरू केली. नेहा यांनी याबाबत बहिणीला सांगताच तिच्याकडूनही पैसे उकळण्यास सुरुवात केली.
२०१४ ते एप्रिल २०२० पर्यंत सय्यदने नेहा यांच्याकडून ४० तोळे सोने आणि दीड कोटी रुपये उकळले. तर तिच्या बहिणीकडून १०० तोळे सोने, १ कोटी रुपये तसेच त्यांच्या मर्सिडीज कारसह दोन शेवरलेट वाहनेही बळजबरीने ताब्यात घेतली. वेळोवेळी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन नेहा यांना जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. सय्यदच्या वाढत्या अपेक्षांमुळे अखेर २१ मार्च रोजी नेहा यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार नागपाडा पोलिसांनी बलात्कार, खंडणी, धमकावणे अशा विविध कलमांअंतर्गत सय्यदविरुद्ध गुन्हा नोंदवला.
* पसार आराेपीचा शाेध सुरू
डॉक्टर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आराेपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आरोपीच्या घरी जाऊन आले. मात्र, त्याच्या घरावरही बँकेची जप्ती आली असून ताे तेथे सापडला नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त संजय कुरुंदकर यांनी दिली.
.....................................