- संतोष आंधळे लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनेकदा निर्जन स्थळावर वा अन्य कोठेही बेवारस मृतदेह सापडतात, अपघातातील मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेतील असतात. आम्हाला कधीकधी घटनास्थळीही जावे लागते. पोलिसांशी संबंध येतो, पण मला माझे काम खूप आवडते. मी मनापासून हे काम करते. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच मी या विषयात करिअर करायचे निश्चित केले होते... डॉ. सारा हिनावी उत्साहाने सांगत असतात. शवविच्छेदन करणाऱ्या त्या महिला डॉक्टर असून, सध्या कूपर रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत आहेत.
डॉ. हिनावी पुढे सांगतात, जिवंत व्यक्ती आपल्याला काय दुखापत झाली आहे वगैरे सांगू शकतात. मात्र, मृत व्यक्ती तिने अखेरचा श्वास कसा घेतला, हे सांगू शकत नाही. आमच्याकडे येणाऱ्या अनेक केसेस या गुन्ह्यातील असतात. संबंधित व्यक्तीची हत्या झालेली असते. त्या व्यक्तीचा मृत्यू कसा आणि कधी झाला, याचा शोध आम्ही शास्त्रीय पद्धतीने घेतो आणि त्याची माहिती पोलिसांना देतो. आम्ही दिलेल्या अहवालावरून पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे प्राप्त होतात. पोलिसांच्या शोधात माझे ज्ञान कामास येते, याचा मला अभिमान वाटतो.
मुलखावेगळे करिअरमूळच्या मुंबईकर असलेल्या डॉ. हिनावी यांचे एमबीबीएसचे शिक्षण पुण्यातील भारती विद्यापीठात झाले असून, पदव्युत्तर शिक्षण नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे. न्यायवैद्यक शास्त्रात करिअर करण्याचे त्यांनी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातच निश्चित केले. २०१५ ते २०१८ या कालावधीत त्यांनी फॉरेन्सिकचे शिक्षण पूर्ण केले. कायद्याची पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. या विषयात आणखी काम करायचे असून, मुलींनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणे गरजेचे असल्याचे मत डॉ. हिनावी व्यक्त करतात. या विषयाबाबत अजून जनजागृती होणे गरजेचे असल्याचेही त्या नमूद करतात.