पोलीस पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवसापासूनच डॉक्टर पत्नीची रुग्णसेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:12+5:302021-05-10T04:06:12+5:30

त्या म्हणतात, मला थांबणे शक्य नाही मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य ...

The doctor started treating his wife from the third day after the death of her husband | पोलीस पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवसापासूनच डॉक्टर पत्नीची रुग्णसेवा सुरू

पोलीस पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवसापासूनच डॉक्टर पत्नीची रुग्णसेवा सुरू

Next

त्या म्हणतात, मला थांबणे शक्य नाही

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावताना, पोलीस निरीक्षक असलेल्या पतीने साथ सोडली. पण, खासगी प्रसूती रुग्णालयात डॉक्टर असल्याने पती निधनाचे दु:ख करत घरात थांबून राहणे मनीषा झेवियर रेगो यांना शक्य नव्हते. पतीच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्याचा निश्चय मनाशी करून पती निधनानंतर तिसऱ्या दिवसापासूनच त्या समुपदेशनाच्या सेवेत उतरल्या. त्यानंतर क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण होताच, त्यांनी रुग्णालयात जाऊन पुन्हा रुग्णसेवा सुरू केली.

कॉर्पोरेट सेक्टरची महागडी नोकरी झुगारून जनतेच्या सेवेसाठी १९९३ मध्ये मुंबई पोलीस दलात दाखल झालेले झेवियर रॉकी रेगो यांची दबंग अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख होती. पत्नी मनीषा या डॉक्टर असल्याने काेराेनाकाळातही दोघे २४ तास कार्यरत होते. कोरोना महामारीच्या काळात खचलेल्या, नैराश्य आलेल्या जवळपास ७०० कुटुंबांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करत, कर्तव्यापलीकडे जाऊन रेगो दाम्पत्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली.

दरम्यान, गेल्या वर्षी वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना रेगो यांना कोरोना झाला. उपचारादरम्यान १३ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. मात्र, नेहमीच आधार देणाऱ्या पतीची साथ सुटल्यानंतर डॉ. मनीषा यांनी खचून न जाता पतीच्या निधनाच्या ३ दिवसांनंतर त्यांचे समुपदेशनाचे कार्य पुढे नेले. पती निधनाचे दुःख खूप माेठे हाेते, तरीही रुग्णसेवेला प्राधान्य देत डॉ. मनीषा यांनी सोशल मीडियावरून कोरोनाबाबत जनजागृती सुरू केली. कोरोनाच्या कठीण काळात सकारात्मक राहण्याचे आवाहन करत कोरोनापासून बचावासाठी आणि कोरोनाची लागण झाल्यावर काय करावे व काय करू नये, याबाबत त्या मार्गदर्शन करू लागल्या.

१४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या पुन्हा सेवेत रुजू झाल्या. डॉ. मनीषा या सध्या बोरीवलीच्या मॅटर्निटी होममध्ये कार्यरत आहेत. कोरोनाकाळात महिन्याला १५ ते २० प्रसूती यशस्वीरीत्या करत आहेत. या सेवेबरोबर त्यांचे समुपदेशनाचे कार्यही सुरू आहे.

* सकारात्मक राहून जबाबदारीने वागणे गरजेचे!

डॉ. मनीषा सांगतात, मला थांबून चालणार नाही. कारण, सध्या माझ्यासारख्या अनेक डॉक्टरांची रुग्णांंना गरज आहे. गर्भवती महिलांना तर जास्त आवश्यकता आहे. हे दिवस लवकर जातील. जगावर आलेल्या संकटाचे भान ठेवून नागरिकांनी सकारात्मक राहून जबाबदारीने वागायला हवे. आजही नागरिक निष्काळजीपणे वावरताना दिसत आहे. त्यांनी काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून स्वत:ची व इतरांचीही काळजी घ्यायला हवी. सत्यस्थितीकडे डाेळेझाक करून चालणार नाही. सध्या दुहेरी मास्क वापरणे गरजेचे आहे. मात्र, येथे एखादा मास्कही लावायला अनेक जण तयार नाहीत. जागरूक हाेणे गरजेचे आहे. नकारात्मक विचार करून चालणार नाही. भूतकाळ, भविष्यकाळाच्या विचारात न जगता वर्तमानकाळात सकारात्मक विचारांनी भविष्य घडवणे, ही काळाची गरज आहे.

.....................................

Web Title: The doctor started treating his wife from the third day after the death of her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.