व्यायामशाळेच्या सदस्यांकडून शुल्क घेत संचालक पसार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 02:12 AM2019-07-14T02:12:31+5:302019-07-14T02:12:33+5:30
व्यायामशाळेच्या २०० सदस्यांकडून वार्षिक शुल्क घेत पसार झालेल्या संचालकाला बेड्या ठोकण्यात बोरीवली पोलिसांना शनिवारी यश आले आहे, तर त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे.
मुंबई : व्यायामशाळेच्या २०० सदस्यांकडून वार्षिक शुल्क घेत पसार झालेल्या संचालकाला बेड्या ठोकण्यात बोरीवली पोलिसांना शनिवारी यश आले आहे, तर त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे.
ग्रीश मेहेतरे असे या व्यायामशाळेच्या संचालकाचे नाव असून, त्याने ‘विनिपूल फिटनेस सेंटर’ नावाने बोरीवलीमध्ये व्यायामशाळा सुरू केली होती. त्यानंतर वार्षिक शुल्काच्या स्वरूपात जवळपास २००हून अधिक लोकांकडून २६ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर २९ जानेवारी, २०१९ रोजी व्यायामशाळेत डागडुजी करायची असल्याचे सांगून सदस्यांना १५ दिवसांची सुट्टी दिली आणि पत्नी ज्योत्स्ना हिच्यासह पसार झाला.
पंधरा दिवसांत व्यायामशाळा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे त्याने सदस्यांना सांगितले होते. मात्र तीन महिने उलटूनही व्यायामशाळा उघडली नाही. तसेच त्या ठिकाणी कोणतेही दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे सदस्यांनी मेहेतरे जोडप्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणालाच उत्तर दिले नाही. त्यांचे हे वागणे संशयास्पद होते. ही बाब जीम सदस्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या प्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस या जोडप्याच्या मागावर होते. शनिवारी ग्रीश याला अटक करण्यात आली असून, ज्योत्स्नाचा अद्याप शोध सुरू आहे. या जोडप्याने फसवणूक केलेल्यांमध्ये चित्रपट लेखक, दिग्दर्शक, माजी लष्कर अधिकारी तसेच अनेक उच्चभ्रू लोकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.