आजपासून जे.जे रूग्णालय आणि आमचा संबंध संपला - डॉ. तात्याराव लहाने
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 04:27 PM2023-06-02T16:27:46+5:302023-06-02T16:28:28+5:30
सर जे.जे रूग्णालय आणि आमचा संबंध संपला असल्याचा मोठा निर्णय डॉ. तात्याराव यांनी घेतला आहे.
मुंबई : आजपासून सर जे.जे रूग्णालय आणि आमचा संबंध संपला असल्याचा मोठा निर्णय डॉ. तात्याराव यांनी घेतला आहे. जे.जे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांचं आंदोलन आंदोलन अद्याप सुरू आहे. आंदोलकांनी केलेल्या आरोपावर डॉ. लहाने यांंनी स्पष्टीकरण दिले असून आम्हाला न विचारता गुन्हा दाखल केला असल्याचं म्हटलं आहे. आमची एकही बाजू न ऐकता जे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं ते ऐकून चौकशी झाली आणि आम्ही दोषी असल्याचं वर सांगण्यात आलं, असंही लहाने यांनी सांगितलं.
तसेच आमचं काहीही ऐकून न घेता निर्णय घेतल्यामुळे मी हा निर्णय घेत असल्याचं लहाने यांनी पत्रकार परिषदेतून नमूद केलं. जे. जे रुग्णालयातील ७५० निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही. रुग्णालयात संप असला तरी रुग्णव्यवस्थेवर फारसा परिणाम दिसून आला नाही. मात्र, संप असाच सुरू राहिला तर गरीब रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, सर जे जे रुग्णालयातील नेत्र विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नऊ अध्यापकांनी बुधवारी राजीनामा दिला. राजीनामा दिलेल्यांमध्ये माजी विभागप्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांचाही सहभाग होता. निवासी डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे आणि गेल्या वर्षभरात रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी केलेल्या छळवणुकीमुळे राजीनामा देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
काय आहे प्रकरण?
- गेल्या काही दिवसांपासून नेत्र विभागातील निवासी डॉक्टर विरुद्ध नेत्र विभागप्रमुख आणि माजी विभागप्रमुख असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.
- या विभागात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नियम पायदळी तुडविले जात असून वरिष्ठ डॉक्टर मनमानी कारभार करत असल्याची तक्रार निवासी डॉक्टरांनी संबंधित यंत्रणेकडे केली आहे.