लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नक्षलवादी संघटनेच्या नावाने धमकीचे पत्र पाठवून गोरेगाव येथील एका ज्येष्ठ डॉक्टरला ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या त्रिकूटाचा डाव गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष १२ च्या पथकाने हाणून पाडला. याप्रकरणी एका तरुणीसह तिघींना अटक केली आहे. बासकी बिश्वास (रा. घणसोली), हयात शाह व विक्रांत सुभाषचंद्र किराट (रा. विरार पश्चिम), अशी त्यांची नावे आहेत. यूट्यूब बघून डॉक्टरला लुटण्याचा कट रचल्याची कबुली आरोपींनी दिली आहे
त्यांनी डॉ. वाडीलाल लखमशी शहा (७६, रा. गोरेगाव पूर्व) यांना लुटण्याचा बनाव केला होता. प्रभारी निरीक्षक महेश तावडे, निरीक्षक विलास भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना ३६ तासाच्या आत अटक केली.
शाह याला आर्थिक अडचणी भेडसावत होत्या. त्यामुळे त्याने त्याचे फॅमिली डॉ. शहा यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा कट रचला. त्यासाठी बासकी बिश्वास हिला बुरखा घालून शहा यांच्या भाच्याच्या मेडिकल शॉपमध्ये पाठवून एक बंद पाकीट दिले. त्याने रात्री ते मामाकडे उघडून पाहिले असता, लाल सलाम संघटनेच्या नावाच्या लेटरपॅडवर एस. के मादोरे नावाच्या हस्तलिखित पत्र लिहून ५० लाखांची खंडणी मागितली. अन्यथा डॉ. शहा व त्याच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत त्यांनी तक्रार दिल्यानंतर युनिटच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून तिघांना शिताफीने पकडले.