लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उपचारासाठी डॉक्टर घरी आले नाही म्हणून डॉक्टरला दवाखान्यातच कोंडल्याचा प्रकार शिवाजीनगरमध्ये समोर आला आहे. डॉक्टरने शटर उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न करताच पेव्हर ब्लॉकने हल्ला करण्यात आला. यातून डॉक्टर थोडक्यात बचावले. मानखुर्द येथील रहिवासी असलेले डॉक्टर फरहान अहमद इरफान अन्सारी (३३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास गोवंडीत राहणारे शाहिद अन्सारी दवाखान्यात आले. मुलाचा रात्री अपघात झाला असून त्याला खूप त्रास होत आहे, त्यासाठी त्यांच्या घरी येऊन उपचार करण्यास सांगितले. मात्र दवाखान्यात रुग्ण असल्याने त्यांनी रुग्ण तपासून झाल्यानंतर येतो, असे सांगितले. त्यानंतर शाहीद अन्सारी तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांचा मुलगा तेथे धडकला आणि घरी उपचारासाठी आले नाही म्हणून डॉक्टरला शिवीगाळ केली. रागाने शटर बंद करत डॉक्टरला दवाखान्यात कोंडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शटर उघडताच या तरुणाने दवाखान्याच्या बाहेर पडलेला पेव्हर ब्लॉक उचलून त्यांच्या दिशेने फेकला. ते खाली वाकल्यामुळे थोडक्यात बचावले. त्यानंतर पुन्हा हाताने मारहाण करीत, दमदाटी केली.
डॉक्टर अन्सारी यांनी नियंत्रण कक्षात फोन करून मदत मागितली. त्यानंतर लगेच शिवाजीनगर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.