मुंबई : आधार कार्ड नोंदणीच्या नावाखाली सायन रुग्णालयातील डॉक्टर महिलेची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी सायन पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सायन परिसरात तक्रारदार डॉक्टर प्रतिभा मुकंदन (३०) कार्यरतआहेत. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास फोन आला़ बंकेतून बोलत असल्याचे सांगून, बंकेचे डेबीट व क्रेडीट कार्ड हे आधारकार्डशी लिंक नसल्याने बंद झाल्याचे त्यांना सांगण्यात आले़ त्यांना डेबीट आणि क्रेडीट काडर््सची माहिती देण्यास सांगितली़ मोबाईलवर आय मोबाईल व एअरडाईड हे अॅप डाउनलोड करून आधारकार्ड लिंक करण्यास सांगितले.त्यानुसार, त्यांनी अॅपमधून त्या अज्ञात इसमाने सांगितलेप्रमाणे कार्डची माहिती भरली़ पंरतु मोबाईलमध्ये फिंगरप्रीटचे आॅपशन नसल्याने पुढील कारवाई झाली नाही. अखेर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने पुन्हा कॉल करुन आधारकार्ड लिंक होत नसल्याचे सांगितले. लवकरात लवकरात कार्डची माहिती देण्यास सांगितली.त्यांनी माहिती देताच, त्यांना ओटीपी क्रमांक मिळाले. ते ओटीपी क्रमांक फोन करणाऱ्यास त्यांनी दिले़ त्यानंतर दोन तासाने त्यांच्या खात्यातून सुरुवातीला ४८ हजार ५०० रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी शुक्रवारी सायन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन सायन पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत़ तज्ज्ञांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे़
आधार कार्ड नोंदणीच्या नावाखाली डॉक्टर महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 3:10 AM