कोविड वगळता अन्य सेवा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (सीसीआयएम) कायद्यातील सुधारणेची अधिसूचना चुकीची असल्याचा आरोप करीत याविराेधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) संप पुकारला आहे. त्यानुसार, ११ डिसेंबरला कोविड व अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य कामे, शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत, अशी माहिती आयएमएने दिली आहे.
११ डिसेंबरला सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत संप पुकारला जाईल. या दिवशी आयसीयू, सीसीयू याबरोबरच कॅज्युअल्टी, लेबर रुम्स, इमर्जन्सी सर्जरीचे कामकाज सुरू राहील. मात्र इलेक्टिव्ह सर्जरी केल्या जाणार नाहीत, असे असोसिएशनने पत्रकात नमूद केले आहे. ओपीडी, दवाखाने, क्लिनिक्स, प्लान करता येण्याजोग्या आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया स्थगित ठेवल्या जातील.
मिक्सोपॅथीला प्रोत्साहन देण्याच्या विचारात असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सर्व ४ समित्या बरखास्त करण्यात याव्यात. भारत सरकारने सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखांमध्ये आणि प्रकारांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांचा विकास करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यास आयएमए नॅशनल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल आणि सर्व आयएमए राज्य शाखा संबंधित उच्च न्यायालयांमध्ये आणि काही स्थानिक आयएमए शाखा संबंधित जिल्हा न्यायालयांमध्ये खटले दाखल करतील, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
* ‘अधिसूचनेला कायद्याचा आधार नाही’
आयुर्वेद शाखेतील परवानगी दिलेल्या शस्त्रक्रिया इंडियन मेडिसिन सेंट्रल कौन्सिल ॲक्ट १९७० आणि सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांच्या कायदेशीर अधिकार कक्षेबाहेरील आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्रातील औषधे, शस्त्रक्रिया परस्पर शिकवण्यासाठी सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनला कोणतेही हक्क नाहीत. त्यासाठी त्यांना आधुनिक वैद्यक शास्त्रातील शिक्षणाचे नियोजन करणाऱ्या नॅशनल मेडिकल कमिशनची अधिकृत परवानगी घ्यावी लागेल. मात्र असे न करता जारी केलेल्या या अधिसूचनेला कायदेशीर बैठक नाही, असा आयएमएचा दावा आहे.
........................................