डॉक्टर, परिचारिकांना पीपीई किटमुळे येणाऱ्या घामाचा त्रास होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 09:02 AM2021-05-19T09:02:42+5:302021-05-19T09:03:16+5:30

मुंबईतील विद्यार्थ्याचे संशाेधन; हवा संनियंत्रित करणारी यंत्रणा विकसित

Doctors and nurses will be less likely to suffer from sweating due to PPE kit | डॉक्टर, परिचारिकांना पीपीई किटमुळे येणाऱ्या घामाचा त्रास होणार कमी

डॉक्टर, परिचारिकांना पीपीई किटमुळे येणाऱ्या घामाचा त्रास होणार कमी

Next

मुंबई : तासन्‌तास पीपीई किट घालून कोरोना रुग्णांची सेवा करून घामाघूम हाेणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आता लवकरच यातून सुटका होणार आहे. मुंबईच्या के.जे. सोमैया अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या निहाल सिंग आदर्श याने अशी व्हेंटिलेशन सिस्टिम विकसित केली आहे ज्यामुळे पीपीई किटमधूनही या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना घामाघूम न हाेता मोकळा आणि ताजा श्वास घेता येणे शक्य होईल.

अनेक तास पीपीई किटमध्ये राहून होणाऱ्या फंगल संसर्गापासून या डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बचाव होऊन आरोग्य सुरक्षित राहण्यास यामुळे मदत होणार आहे. आतापर्यंत प्रोटोटाइपमध्ये असणाऱ्या निहालचे हे संशोधन वॅट टेक्नोव्हिएशन या त्याच्या स्टार्टअप कंपनीद्वारे मे, जूनपर्यंत बाजारात वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती निहालने दिली.

पुण्यात राहणाऱ्या निहालची आई डॉक्टर असल्याने डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी यांना पीपीई किटमध्ये काय त्रास होतो, घामामुळे बुरशीजन्य आजारांचा धोका कसा संभवतो, याची कल्पना निहालला होती. यावर उपाय म्हणून त्याने उपायात्मक संशोधन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून ‘कोव्ह-टेक व्हेंटिलेशन सिस्टम’ची निर्मिती झाली. त्याच्या या संशोधनात त्याला त्याचे २ साथीदार ऋत्विक मराठे आणि सायली भावसार यांची खूप मदत झाली. या दोघांनी या संशोधनात चीफ डिझाइन इंजिनिअर आणि डिजिटल मार्केटिंग आनंद कंटेंट हेड म्हणून काम पहिले असून, त्यांच्याशिवाय हे पूर्णत्वास आले नसते अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

२० दिवसांमध्ये प्रोटोटाइप स्वखर्चाने बनवून झाल्यानंतर निहालने पुढील प्रक्रियेच्या निधीसाठी अर्ज केला आणि ऑक्टोबर २०२० पर्यंत त्याला प्रयास (एक्सेलेऱीटिंग युथ अस्पायरिंग टेक्नॉलॉजी इंटरप्रेनर्स )कडून १ लाखाचा निधी प्राप्त झाला. केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या साहाय्याने (एनएसटीईडीबी) आरआयआयडीएल (रिसर्च इनोव्हेशन इनक्युबेशन डिझाइन लॅबोरेटरी) येथे त्याने आपले संशोधन उपकरणात विकसित केले. लवकरच ही प्रणाली आणि यंत्रणा www.wattechnovations.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

संसर्गाचा प्रादुर्भाव टाळणे शक्य
‘कोव्ह-टेक व्हेंटिलेशन सिस्टिम’ हे उपकरण पारंपरिक पीपीई सूटच्या आतमध्ये कमरेवर साध्या पट्ट्याप्रमाणेच घट्ट बांधता येते. हे उपकरण चार्ज करता येत असून, त्याला असलेल्या एका बटणाच्या साहाय्याने त्यातील पंख्याचा वेग कमी-जास्त नियंत्रित करता येतो. या व्हेंटिलेशन सिस्टिममुळे पीपीई किटमध्ये हवा खेळती राहते मात्र, त्याचवेळी किट बंद असल्याने संसर्गाचा प्रादुर्भावही टाळला जातो. पुण्याच्या काही रुग्णालयांत याचा प्रायोगिक वापर सुरू झाला असून, लवकरच ते सर्वत्र उपलब्ध होईल अशी माहिती निहालने दिली.
 

Web Title: Doctors and nurses will be less likely to suffer from sweating due to PPE kit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.