उपचार सुरू केल्यानंतर काही वेळातच २५ लाखांची मंजुरी; सैफ अली खानच्या मेडिक्लेमवरुन डॉक्टर संघटनेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 18:22 IST2025-01-26T18:21:43+5:302025-01-26T18:22:14+5:30
अभिनेता सैफ अली खानच्या मेडिक्लेमच्या मंजुरीवर डॉक्टरांच्या संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.

उपचार सुरू केल्यानंतर काही वेळातच २५ लाखांची मंजुरी; सैफ अली खानच्या मेडिक्लेमवरुन डॉक्टर संघटनेचा सवाल
Saif Ali Khan Mediclaim: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या उपचारासाठी मिळालेल्या आरोग्य विम्याच्या दाव्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी मंजूर करण्यात आलेल्या मेडिक्लेमच्या दाव्यावर सवाल विचारला जातोय. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सने भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला यासंदर्भात पत्र देखील लिहिलं. या पत्रात सेलिब्रिटींना अतिरिक्त प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला होता. सेलिब्रिटींसाठी विमा दाव्यांवर प्रक्रिया करण्याच्या पद्धतीतील तफावतीवर संघटनेने टीका केली आहे.
लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफसाठी कॅशलेस उपचाराचा मेडिक्लेम तात्काळ मंजूर करण्यात आला. सैफवर उपचार सुरू असताना त्याला विमा कंपनीकडून २५ लाख रुपयांची मंजुरी मिळाली. सैफ अली खान सहा दिवस रुग्णालयात होता आणि त्याचे २६ लाख रुपयांचे बिल झाले होते. त्यामुळे एवढी मोठी रक्कम इतक्या लवकर कशी मंजूर झाली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाहायला गेलं तर सामान्य व्यक्तीच्या बाबतीत, आरोग्य विमा कंपनी फार वेगाने काम करत नाही आणि मंजुरीसाठीची कागदपत्रेही आधी पूर्ण करावी लागतात. मात्र सैफच्या प्रकरणात विमा कंपनीने दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेक सवाल विचारले जात आहेत.
डॉक्टरांची संघटना मेडिकल कन्सल्टंट असोसिएशनने विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला पत्र लिहून या वादावर चिंता व्यक्त केली. सैफ अली खान सेलिब्रिटी असल्यामुळे विमा कंपनीने त्याला विशेष सेवा पुरवली. कंपनी इतर ग्राहकांशी असे अजिबात वागत नाही. बहुतेक पॉलिसीधारकांना कंपनीकडून सुरुवातीला फक्त ५०,००० रुपये मंजूर केले जातात. अशा प्रकरणांमध्ये, एफआयआर कॉपी विचारली जाते आणि ती सामान्य प्रक्रियेचा एक भाग आहे, असं डॉक्टरांच्या संघटनेने म्हटलं.
मेडिकल कन्सल्टंट असोसिएशनच्या पत्राने भारताच्या आरोग्य विमा क्षेत्रातील भेदभावाच्या प्रणालीवर टीका केली आहे. या पत्रात असेही म्हटलं की हा ट्रेंड इक्विटेबल हेल्थकेअर ऍक्सेसच्या तत्त्वाला कमकुवत करतो. आरोग्य विमा तज्ज्ञ निखिल झा यांनीही या पत्रावर प्रतिक्रिया दिली.
"काही तासांतच दावा मंजूर झाला. बहुतेक पॉलिसीधारकांना न मिळणारी ही गती होती. अशावेळी एफआयआर प्रत मागणे ही सामान्य प्रक्रिया आहे. परंतु विमा कंपनीने ही प्रक्रिया बाजूला ठेवून २५ लाख रुपयांची कॅशलेस रिक्वेस्ट तात्काळ मंजूर केली. संपूर्ण बिल ३६ लाख रुपयांचे होते, तेही मंजूर झाले. पण शस्त्रक्रिया आणि चार दिवस मुक्काम हा या अवाढव्य बिलाचा आणि त्याला मिळालेली तत्काळ मंजुरी शंका उपस्थित करणारी आहे. जर या जागी एक सामान्य व्यक्ती असती, तर कंपनीने वाजवीनशुल्क लागू केले असते आणि क्लेम मंजूर केला नसता," असं निखिल झा म्हटलं.
🚨Association of Medical Consultants Mumbai writes to IRDAI
Why was preferential treatment given to Saif Ali Khan?
"Apparently the Insurance company sanctioned 25 lakhs within a few hours to Lilavati hospital for the treatment of Saif Ali Khan.
The normal process is to ask… pic.twitter.com/1QyPrTD8gM— Nikhil Jha (@NIKHILLJHA) January 25, 2025
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटनेने आपल्या पत्रात केली आहे. तसेच, सर्व ग्राहकांना समान वागणूक द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत फरक असला तरीही सर्वांना समान वागणूक द्यायला हवी असं संघटनेने म्हटलं.