‘डॉक्टर्स डे’ कोरोनाचे दीड वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:25+5:302021-07-01T04:06:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पहिल्या लाटेत मोजकी औषधे होती, त्यांचा रुग्णांना फायदा होत होता. पण, दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पहिल्या लाटेत मोजकी औषधे होती, त्यांचा रुग्णांना फायदा होत होता. पण, दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस, डेल्टा प्लससारखे प्रकार आले. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विविध आव्हानांचा सामना करावा लागला, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मसीना रुग्णालयाच्या पूलमोनोलॉजिस्ट कन्सल्टंट डॉ. सोनम सोळंकी म्हणाल्या की, पहिल्या लाटेदरम्यान हाताळली नाही अशी आव्हाने दुसऱ्या लाटेत होती.
आता आपल्याला सर्व माहीत आहे या विचारात होतो. डेल्टा आला ज्यामुळे भारतात दुसरी लाट निर्माण झाली. एक वर्षानंतर आपण गंभीर स्थितीत आलो. दुसऱ्या लाटेच्या वेळी मला आणि माझ्या कर्मचाऱ्यांना भेडसावणारी ही सर्वांत मोठी आव्हाने होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे व्यवस्थापन करण्यात मला एक महत्त्वाचे आव्हान होते ते म्हणजे आजारावर नियंत्रण मिळविणे. या साथीच्या रोगाच्या एका वर्षानंतर, आम्हाला वाटले की आपण यशस्वी झालो आहोत. आम्हाला वाटले की हा आजार असा आहे, ज्याच्यावर काही औषधे उपलब्ध आहेत. लसीकरण मोहीम खूप प्रभावीपणे चालू आहे. परंतु, नंतर ज्या पद्धतीने संख्या वाढली, आमच्याकडे असे रुग्ण होते की त्यामध्ये तरुणांचाही समावेश होता. आमच्याकडे असे रुग्णदेखील होते ज्यांना अद्याप कोणताही गंभीर आजार झालेला नव्हता. असे रुग्णदेखील होते जे होम क्वारंटाइन असताना चांगले होते परंतु पुढील २४-४८ तासांच्या आत त्यांना खूपच लागण झाली.
नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर सर्व्हिसेसचे संचालक डॉ. अब्दुल अन्सारी म्हणाले, गेले वर्ष आमच्या वैद्यकीय कारकिर्दीतील अभूतपूर्व वर्ष होते. आजवर आपल्या प्रियजनांचे जीवन भीतीच्या छायेत ठेवून आम्ही कधीच काम केले नव्हते. शिवाय, आम्ही अशा संसर्गावर उपचार करीत होतो जो पूर्णपणे समजला नव्हता. आम्ही रुग्णांवर उपचार करीत असताना विषाणू शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रक्रिया चालूच राहिली. रुग्णांचा ओघ इतका जबरदस्त होता की कितीही मोठी वैद्यकीय संसाधने असली तरी आम्ही सतत संघर्ष केला. आपल्या प्रियजनांपासून दूर एकांतात पीडित रुग्णांना पाहण्याच्या भावनिक टप्प्यातूनही आम्ही गेलो.