Doctors Day: तूच मायबाप, बंधू, तूच प्राणसखा!; डॉक्टरांवर दुहेरी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 04:38 AM2020-07-01T04:38:28+5:302020-07-01T04:38:42+5:30

गंभीर कोरोना रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्याचे आव्हान

Doctors Day: You are my parents, brothers, you are my soul mate !; Dual responsibility on doctors | Doctors Day: तूच मायबाप, बंधू, तूच प्राणसखा!; डॉक्टरांवर दुहेरी जबाबदारी

Doctors Day: तूच मायबाप, बंधू, तूच प्राणसखा!; डॉक्टरांवर दुहेरी जबाबदारी

Next

मुंबई : आयसीयूत दाखल झालेल्या कोरोना रुग्णांनी आजारावर मात केली तरी त्यापैकी अनेकांना पुन्हा उभारी घेण्याचे बळ एकवटता येत नाही. ते आजाराच्या प्रचंड दहशतीखाली असतात. आप्तस्वकीयांच्या धीर देणाऱ्या मायेच्या हातलाही पारखे होतात. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनाच त्यांच्या मानसिक वेदनांवर फुंकर घालत मनोधैर्य वाढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात टाकून रुग्णसेवा करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीच रुग्णांचे कुटुंबीय होत त्यांच्यात जगण्याची नवी ऊर्जा फुंकताना दिसतात.

कोरोना या आजाराबद्दल प्रचंड दहशत समाजामध्ये निर्माण झालेली आहे. गंभीर रुग्ण जेव्हा आयसीयूत दाखल होतो तेव्हाच त्याच्या मनात ही भीती दाटलेली असते. त्यापैकी काहींना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. काहींना प्रचंड साइड इफेक्ट असलेल्या औषधांचा मारा सहन करावा लागतो. आयसीयूत अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून अनेक रुग्णांना या आजारातून बाहेर काढतात. परंतु, हे रुग्ण जेव्हा शुद्धीवर येतात तेव्हा डॉक्टरांसमोर नवे आव्हान उभे ठाकलेले असते. रुग्णाला सभोवताली कुठेही सर्वसाधारण माणसे दिसत नाहीत. पांढºया आणि हिरव्या रंगाची पीपीई किट परिधान केलेली, मास्क, गॉगल घातलेले वैद्यकीय कर्मचारी बघून रुग्ण भेदरतात.

कुणाला परग्रहावर आल्याचा भास होतो. तर काही जण आम्हाला भूत समजतात. अनेकदा डॉक्टरांच्या चेहºयावरचे आणि डोळ्यांतील भाव रुग्ण वाचत असतात. परंतु, इथे ना चेहरे दिसतात ना बोललेला आवाज सर्वसाधारण पद्धतीने ऐकू जातो. त्यामुळे रुग्ण प्रचंड गोंधळलेले आणि अस्वस्थ असतात. समाजाने आपल्याला दूर लोटल्याची सल त्यांना बोचत असते. त्यामुळे अनेक जण मानसिकदृष्ट्या खचतात, असे फोर्टिस हॉस्पिटलच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटचे प्रमुख डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

मानसोपचार तज्ज्ञांना कोविड आयसीयूमध्ये दाखल होऊन रुग्णांचे कौन्सिलिंग करणे शक्य होत नाही. कुटुंबीयांना भेटण्याची प्रचंड तळमळ प्रत्येक रुग्णाला असते. मात्र, या आजाराने ते बळही हिरावून घेतले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिवसातून एकदा कुटुंबीयांशी संवाद होत असला तरी तो अपुरा असतो. त्यामुळे प्रत्येक वैद्यकीय कर्मचाºयाने रुग्णाजवळ गेल्यानंतर आस्थेने चौकशी करून त्याचे मनोधैर्य वाढेल अशी किमान चार वाक्ये बोलण्याचे बंधन आम्ही घालून घेतले आहे. कुणी विनोदी किस्से सांगतात, तर कुणी रुग्णाची आवड जाणून घेत त्याला वाचनाचे साहित्य किंवा मोबाइलवर संगीत ऐकण्याची व्यवस्था करतात. आयसीयूमधून वॉर्डमध्ये दाखल झाल्यानंतर तिथे कौन्सिलिंग आणि अन्य उपचार शक्य होतात. परंतु, आयसीयूत दाखल असलेल्या आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या रुग्णाला बळ देणे हे मोठे आव्हान असल्याचे डॉ्रक्टर्स सांगतात.

पोस्ट कोविड ओपीडींची गरज
कोविडचे निदान होण्यापूर्वी फिवर क्लिनिक जशा पद्धतीने चालवली जातात त्या धर्तीवर पोस्ट कोविड ओपीडींची नितांत गरज आहे. आजारावर मात करणाºया रुग्णांना तिथे वैद्यकीय उपचार आणि फिजिओ थेरपीची व्यवस्था हवी. त्याशिवाय कोरोनासंलग्न अन्य दुष्परिणामांवर मात करण्याचे बळ आणि आजारावर मात करून लढण्याची नवी उमेद निर्माण करणारे कौन्सिलिंगही तिथे हवे. ही काळाची गरज असून फोर्टिस हॉस्पिटलमध्ये तशी ओपीडी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

Web Title: Doctors Day: You are my parents, brothers, you are my soul mate !; Dual responsibility on doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.