Join us

रुग्णालयातील वाढत्या हल्ल्यांविरोधात ठोस यंत्रणेची डॉक्टरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:51 AM

इंडियन मेडिकल असोसिएशनने २०१५ सर्वेक्षणानुसार, कमीतकमी ३-४ डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी वाढत्या हिंसेला सामोरे जावे लागले. मार्च २०१७ मध्ये, मुंबईतील १७ सरकारी रुग्णालयांतील २ हजारांहून अधिक ज्युनियर डॉक्टरांना हल्ल्यांना तोंड द्यावे लागले.

मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशनने २०१५ सर्वेक्षणानुसार, कमीतकमी ३-४ डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी वाढत्या हिंसेला सामोरे जावे लागले. मार्च २०१७ मध्ये, मुंबईतील १७ सरकारी रुग्णालयांतील २ हजारांहून अधिक ज्युनियर डॉक्टरांना हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. याविरोधात, डॉक्टरांनी चार दिवसीय संप पुकारला. त्यामुळे १ जुलै रोजी साजऱ्या होणाºया ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने डॉक्टरांनी हल्ले रोखण्यासाठी रुग्णालयांत ठोस यंत्रणा हवी, अशी मागणी केली.डॉक्टरांच्या हल्ल्यांतील हिंसा म्हणजेच शाब्दिक गैरवर्तन, धमकी आणि धमकीचे स्वरूप, मारहाण, तीक्ष्ण हत्यारांचा वापर, चोरी आणि संपत्तीचे नुकसान या स्वरूपातील आहे. महिला डॉक्टरही आक्रमकतेच्या अशा प्रकारांना बळी पडतात. ट्रेनिंग आॅफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे अधिष्ठाता डॉ. ए. के. खोखर यांनी याविषयी सांगितले की, रुग्णांमधील असंतोष हे हिंसाचाराचे प्रमुख कारण आहे. शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, ट्रॉमा व आपत्कालीन विभागांत हे प्रकार घडताना दिसतात. त्यामुळे रुग्णांची काळजी घेण्याºया डॉक्टरांना सुरक्षित वातावरणाची नितांत आवश्यकता आहे.रुग्णांच्या अतिकाळजीऐवजी रुग्णाची प्रकृती, त्यावर सुरू असलेले उपचार, डॉक्टर घेत असलेली मेहनत नातेवाईकांनी समजून घेतली पाहिजे. रुग्णांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्यांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.रुग्णांच्या वैद्यकीय स्थितीविषयी जबाबदार मित्र आणि नातेवाईकांशी सुस्पष्ट आणि सुसंगत संवाद हवा. रुग्णांना वैद्यकीय उपचाराची जोखीम किंवा मर्यादांबद्दल सांगितले पाहिजे. सोबतच इस्पितळांमध्ये डॉक्टर, व्यवस्थापक आणि रुग्णालयांच्या कर्मचाºयांना प्रशिक्षित करणे आणि हिंसा रोखणे आवश्यक आहे, असे डॉ. एस.डी. गुप्ता यांनी सांगितले.महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या ५०च्या आसपास घटना घडल्या आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहवालानुसार किमान ७५ टक्के डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी हिंसाचाराला सामोरे जावे लागते. देशात डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असून आजघडीला किमान ५ लाख अतिरिक्त डॉक्टरांची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार एक हजार रुग्णांमागे एक डॉक्टर असे प्रमाण असायला हवे, पण भारतात ते दोन हजार रुग्णांमागे एक इतके कमी आहे. ग्रामीण भागात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे डॉक्टर तिथे जाण्यास तयार होत नाहीत. डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे उपलब्ध डॉक्टरांवर ताण येतो, यातूनच रुग्ण, नातेवाई, डॉक्टरांमधील संवाद तुटतो, असे डॉ. तन्वीर मोहमंद म्हणाले. हे सर्व रोखण्यासाठी ठोस यंत्रणेची गरज असल्याचे मतही डॉक्टरांनी व्यक्त केले.

टॅग्स :डॉक्टर