अवयवदानासाठी डॉक्टराची ‘एव्हरेस्टवारी’
By admin | Published: June 13, 2017 02:33 AM2017-06-13T02:33:56+5:302017-06-13T02:33:56+5:30
समाजात अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि समाजाच्या सर्व स्तरातील घटकांना अवयवदान करण्याचे आवाहन करण्यासाठी मुंबईतील डॉ. संदीप गोरे
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समाजात अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि समाजाच्या सर्व स्तरातील घटकांना अवयवदान करण्याचे आवाहन करण्यासाठी मुंबईतील डॉ. संदीप गोरे यांनी थेट ‘एव्हरेस्टवारी’ केली. डॉ. गोरे यांनी १५ मे रोजी ५३६४ मीटरवरील माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचून हातात फलक दर्शवित अवयवदानाचा संदेश दिला.
एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करून त्यानंतर १६ मे रोजी डॉ. गोरे ५ हजार ५४५ मीटर्सवर असलेल्या कालापत्थर येथेही पोहोचले. या ट्रेकच्या माध्यमातून अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्याचा डॉ. गोरे यांचा उद्देश होता. या ट्रेकर्स टीममध्ये १२ सदस्यांचा समावेश होता. यात आॅस्ट्रेलियातील ४, युकेचे २, अमेरिकेतील २ आणि भारतातील ४ जण होते. ७ मे रोजी लुक्ला-फाडकिंग या २६५१ मीटर उंचीवर असलेल्या ठिकाणाहून या ट्रेकची सुरुवात झाली. ३ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या नामचे बझारकडे या टीमने कूच केली. नामचे बझार येथे एक दिवस थांबून या टीमने सराव होण्यासाठी आसपासच्या छोट्या शिखरांचा अभ्यास केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही टीम तेंगबोचेच्या दिशेने रवाना झाली. सकाळी डॉ. गोरे आणि त्यांची टीम गोराखेपवरून लोबुचेच्या दिशेने एव्हरेस्ट बेस कँपचा अभ्यास करण्यास रवाना झाली. १० दिवसांच्या खडतर ट्रेक आणि सरावानंतर १५ मे रोजी ही टीम बेस कॅम्पला पोहोचली. १६ मे रोजी डॉ. गोरे यांच्या नेतृत्वाखाली या टीमने कालापत्थर या बेसकँपच्या पुढील टप्प्यावर पाऊल ठेवले. या संपूर्ण प्रवासात डॉ. गोरे तेथील स्थानिक रहिवासी, छोटे समुदाय, इतर ट्रेकर्स यांच्याशी अवयवदानाबद्दल बोलत होते.
उंचीवरील ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी योग्य प्रशिक्षणाची गरज असते. ट्रेकिंगच्या १८ वर्षांच्या अनुभवामुळे या ट्रेकचे नेतृत्व करणे सोपे झाले. ट्रेकच्या ४-५ महिने आधीपासून फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी एरोबिक ट्रेनिंग सुरू केली. तर फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी श्वासाचे व्यायामही केल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले.
एखाद्या समाजाभिमुख मोहिमेला समाजातील तळागाळात पोहोचविण्यासाठी अशा प्रकारची मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. डॉक्टर म्हणून अनेकदा अवयव उपलब्ध न झाल्याने रुग्णांना जीव गमाविताना पाहिलेले असल्याने या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली. त्यातून जीवरक्षक उद्दिष्टाला जगातील सर्वांत उंच ठिकाणी नेण्याचे स्वप्न बाळगले आणि प्रत्यक्षात साकारण्यासाठी खूप मेहनतही केली. - डॉ. संदीप गोरे