मुंबई : स्त्रीरोग विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या ३० वर्षीय डॉ. अमोल पंपतवार या तरुण डॉक्टरचा शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून कोल्हापूर येथे डॉ. अमोल फेलोशिपचे काम करत होते. तीनच महिन्यांपूर्वी डॉ. अमोल यांचे लग्न झाले होते.जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथून स्त्रीरोग शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतले. गेल्या एक वर्षापासून ते कोल्हापूर येथे फेलोशिपवर कार्यरत होते. डॉ. अमोल हे खिलाडू वृत्तीचे होते. विशेष म्हणजे त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. त्यांच्या घरातदेखील कोणाला हृदयविकाराचा त्रास नव्हता. मात्र, डॉ. अमोल यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.निवासी डॉक्टरांना क्षयरोग, डेंग्यू, मलेरियाची लागण ही नित्याची बाब झाली आहे. तथापि, अवघ्या ३० वर्षांच्या डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणे, ही धक्कादायक बाब आहे. या घटनेनंतर डॉ. अमोल पंपतवार यांच्या स्मरणार्थ मार्डने ‘हिल द हिलरर्स’ मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे केली आहे.दोन महिन्यांपूर्वी मार्ड निवासी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. आता या घटनेनंतर फक्त मानसिक तपासणी नाही, तर संपूर्ण आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे तीन वर्षांत निवासी डॉक्टरांची तीनदा तपासणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. डॉ. मुंदडा यांनी सांगितले. कामाचे अतिरिक्त तास, खाण्याच्या अनियमित वेळा, झोप नाही अशा परिस्थितीत निवासी डॉक्टर काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. निवासी डॉक्टरांच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. आरोग्य विद्यापीठ ३१ जानेवारीपर्यंत याविषयी काय निर्णय घेते, याची वाट पाहणार आहोत. त्यानंतर आम्ही कठोर पावले उचलू असे मार्डकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
डॉक्टरचा हृदयविकाराने मृत्यू
By admin | Published: January 09, 2016 2:34 AM