Join us

नायरमधील डॉक्टरांचा सामूहिक ‘काम बंद’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, या पार्श्वभूमीवर महापालिकेने रुग्णांसाठी खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, या पार्श्वभूमीवर महापालिकेने रुग्णांसाठी खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने विरोध करुन मंगळवार ६ एप्रिलपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नायर रुग्णालयातील रुग्णांचे हाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्याने रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यास डॉक्टरांनी विरोध केला आहे. रुग्णालयातील काही खाटा कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, शिकाऊ डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सक्ती करू नये, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांसोबत डॉक्टरांची बैठक सुरू असून मागण्या मान्य न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, मार्ड संघटनेने मागण्या मान्य न झाल्यास ६ एप्रिलपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे.

याविषयी, निवासी मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी सांगितले, कोविड रुग्णांच्या उपचारांसह नाॅन कोविड रुग्णांवरील उपचारही रुग्णालयात सुरू ठेवावेत, जेणेकरून निवासी डॉक्टरांना सर्व वैद्यकीय शाखेतील अनुभव मिळेल. त्याचप्रमाणे, कोरोनाच्या काळात मागील वर्षभरात निवासी डॉक्टरांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने याचा विचार करून संपूर्ण रुग्णालय केवळ कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करू नये. यापूर्वीही वारंवार निवासी डॉक्टरांनी प्रशासनाला याविषयी सांगितले होते, मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.