Join us

निवडणूक कामातून डॉक्टर, नर्सेसना ‘डिस्चार्ज’, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘ड्यूटी’ नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 7:42 AM

बुधवारी रुग्णालयांतील डॉक्टरांनी सह्यांची मोहीम आयोजित करून संबंधित अधिष्ठातांना पत्र निवडणुकीच्या कामातून वगळण्याची विनंती केली हाेती.

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कोणत्याही कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस यांना निवडणुकीच्या कामाला लावणार नाही, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांतील डॉक्टर, नर्सेस आणि रक्त चाचणी करणारे तंत्रज्ञ यांना मंगळवारी मुंबई उपनगरांतील निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालये चालवायची कशी, असा प्रश्न प्रशासनासमोर होता.

‘निवडणुकीच्या दिवसांत आजारी पडू नका,’ अशा मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाले. त्यात महापालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टर आणि नर्सेस यांना  निवडणूक कामाला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे म्हटले होते. त्यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली.   

बुधवारी रुग्णालयांतील डॉक्टरांनी सह्यांची मोहीम आयोजित करून संबंधित अधिष्ठातांना पत्र निवडणुकीच्या कामातून वगळण्याची विनंती केली हाेती. त्यानुसार अधिष्ठाता यांनी सुद्धा डॉक्टरांचे म्हणणे महापालिका मुख्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले हाेते.

मुंबई महापालिकेकडून ज्यावेळी निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली होती. त्यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून आम्हाला माहिती देणे अपेक्षित होते. पालिकेने अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे वगळून द्यावीत. जर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे आदेश असतील तर ती नावे वगळू. डॉक्टर, नर्सेस हे अत्यावश्यक सेवेत येतात, याची जाणीव आहे.  - राजेंद्र क्षीरसागर, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर

टॅग्स :डॉक्टरलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४