Join us

डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपावी

By admin | Published: July 02, 2014 12:48 AM

डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. रुग्णांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई : डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. रुग्णांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले आहे. वाशीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इन मेजर सिटीच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. लोकमत या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. याप्रसंगी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे हे उपस्थित होते. आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे आदिवासींना सेवा पुरवत असताना आलेले आपले अनुभव व्यक्त केले. बाबांच्या प्रेरणेने हेमलकसा येथे आदिवासींची सेवा करण्यात आयुष्याची ४० वर्षे कशी गेली हे आपल्याला कळलेच नसल्याचेही ते म्हणाले. या क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल टाकले तेव्हा आपल्यापुढे भाषेचा प्रश्न होता. तेथील आदिवासींना माढीया भाषेशिवाय इतर कोणतीही भाषा समजत न्हवती. शिवाय शिक्षित व वस्त्र घातलेल्या मनुष्यापासून आदिवासी लोक दूर पळत असत. शिवाय उपचारासाठी मांत्रिकावर त्यांचा अधिक विश्वास असायचा. अशावेळी छोटे छोटे यशस्वी उपचार करत त्यांचा विश्वास आपण प्राप्त केला असल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले. जखमा, आजार, विकार यावर उपचारादरम्यान आदिवासींमध्ये सहनक्षमता अधिक असल्याचे आपल्याला दिसून आले. त्यातूनच आपल्याला प्रेरणा मिळत गेली व खूप काही शिकायला मिळाल्याचे देखील ते म्हणाले. आदिवासींचे दु:ख कमी करायचे याच भावनेने आपण तेथे काम करत राहिल्याची भावनाही त्यांनी व्यक्त करून दाखवली. या दरम्यान इतर शहरी भागातील डॉक्टरांना मदतीला बोलावूनही तेथे रस्ते, वीज नसल्याने तिकडे कोणी फिरकले नसल्याचेही ते म्हणाले. मात्र सध्या तेथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधेसह शिक्षणही रुजवले जात आहे. त्याचेच फलित म्हणजे नुकत्याच झालेल्या दहावी व बारावीच्या निकालात १०० टक्के निकाल लागला असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे जर प्रयत्न केले तर सर्व काही शक्य असल्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच डॉक्टरांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी डॉक्टरांनी रुणांच्या नातेवाईकांचा विश्वास मिळवणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले. गेल्या ४० वर्षांत आपल्यावर एकदाही निष्काळजीपणाचा ठपका आला नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे इतर डॉक्टरांनी देखील सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी कार्यक्र म प्रसंगी दिला. कार्यक्रमप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांनीही डॉ. आमटे दाम्पत्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच नवी मुंबईकरांच्या आरोग्याची जपवणूक करण्यात देखील इथल्या डॉक्टरांचे महत्त्वपूर्ण कार्य असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शहरात २५ वर्षे कार्य करणाऱ्या डॉक्टरांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्र मप्रसंगी डॉ. मंदाकिनी आमटे, महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार, लोकमतचे विजय शुक्ला, कार्यक्रमाचे आयोजक सुनील प्रभाकरन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)