'डॉक्टरांनी लहान मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही, आश्वस्त करावे'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 05:14 PM2021-05-24T17:14:28+5:302021-05-24T17:14:57+5:30

राज्यातील ६ हजार बाल रोग तज्ज्ञांना कोविडविषयक टास्क फोर्सने केले मार्गदर्शन; मुलांमधील कोविडशी संबंधित मानसिक दुष्परिणामांवर देखील चर्चा

'Doctors should reassure parents of children not upset', cm uddhav thackeray | 'डॉक्टरांनी लहान मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही, आश्वस्त करावे'

'डॉक्टरांनी लहान मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही, आश्वस्त करावे'

Next
ठळक मुद्देकोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो

मुंबई - कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून रविवारी या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ३०० बाल रोग तज्ज्ञांना राज्य शासनाच्या कोविड विषयक बाल रोग तज्ज्ञ टास्क फोर्सने वैद्यकीय उपचाराबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले. मुलांमध्ये कोविड आणि कोविडशी संबंधित मानसिक व भावनिक आरोग्याकडे लक्ष देण्यावर देखील चर्चा झाली. लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा, कोविडविरुद्धची आपली एकजुटीची साखळी मजबूत ठेवून या विषाणूला पराभूत करू, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत करतो. रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे, योग्य मार्गदर्शन करावे. कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घ्या.

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पाऊले टाकली आहेत. पुढील काळासाठी सुविधाही वाढवीत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीतही १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एकरकमी घेण्याची आमची तयारी आहे पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत आणि मला खात्री आहे, जूननंतर लस पुरवठा सुरळीत सुरु होईल आणि आम्ही महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरु करू शकू.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम बाल रोग तज्ज्ञांव्यतिरिक्त इतर संस्था व संघटनांमधील सुमारे ५२ हजार डॉक्टर्स आणि हजारो सर्वसामान्य दर्शकांनी विविध माध्यमातून पाहिला. राज्य शासनाने बाल रोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली असून डॉ.सुहास प्रभू हे या अध्यक्ष तर डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत. या तज्ज्ञांनी लहान मुलांमधील कोविड संसर्गावर मार्गदर्शन केले तसेच वैद्यकीय उपचाराबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी अनेक बाल रोग तज्ज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांना टास्क फोर्सने उत्तरे दिली. यावेळी मुख्य टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील यावेळी सुचना केल्या.
 

Read in English

Web Title: 'Doctors should reassure parents of children not upset', cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.