Join us

वेसावे गावातील डॉक्टर मंडळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढे आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 5:16 PM

वेसावा गावात लॉकडाऊन सौम्य केल्याबरोबर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आणि त्यानंतर  स्थिरावलेली करोनाची साथ पुन्हा सुरू झाली, त्यामुळे मलेरिया आणि कोरोना महामारीत मध्ये संपूर्ण वेसावा गाव हैराण झाले होते.

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : वेसावा गावात लॉकडाऊन सौम्य केल्याबरोबर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आणि त्यानंतर  स्थिरावलेली करोनाची साथ पुन्हा सुरू झाली, त्यामुळे मलेरिया आणि कोरोना महामारीत मध्ये संपूर्ण वेसावा गाव हैराण झाले होते. विशेष म्हणजे वेसावे गावातील डॉक्टर मंडळी सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय सेवा देण्यासाठी पुढे आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेसावा कोळी जमातीने  वैद्यकीय अधिकाऱ्यांची यशस्वी बैठक काल घडवून आणली. तातडीने उपाययोजनेसाठी वेसावा गावात सेवा देणारे सर्व डॉक्टर आणि मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त बैठकीत  उपाय आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. वेसावा कोळी जमात ट्रस्टने काल आयोजित केलेल्या हिंगळा देवी सभागृहात वैद्यकीय अधिकारी डॉ आदील पटेल आणि डॉ चारूल भानजी यांनी मार्गदर्शन केले.

वेसावे गावातील निराळ्या समस्यांवर चर्चा करताना महानगरपालिकेचे अजुन एक फिवर क्लिनीक  गावात तात्पुरते सुरू करावे अशी मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. त्यावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन प्रभाग क्रमांक 59च्या स्थानिक शिवसेना नगरसेविका प्रतीमा खोपडे यांनी दिले. महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता  कुलकर्णी आणि वेसाव्यातील डॉक्टर या सभेला उपस्थित होते.

येथील दवाखान्यात येणाऱ्या सर्व रुग्णांची नोंद घेऊन त्याची माहिती तात्काळ महानगर पालिकेला कळविणे, आवश्यक रुग्णांची टेस्ट करून घेणे, परिवाराला क्वारंटाईन बद्दल समज देणे, रुग्णांच्या परिवारांचा  पाठपुरावा करणे अशा जबाबदाऱ्या डॉक्टरांनी स्वीकारले असून,  सामाजिक स्तरावर प्रत्येक गल्ली विभागाने करावयाच्या उपाययोजना याचा तक्ता ट्रस्टच्या माध्यमातून  अमंल करण्यात येणार आहे त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. 

त्याच बरोबर वेसावे गावातील दाटीवाटीने उभी राहिलेली घरे, इमारती खोल्यांमध्ये वारा- सूर्यप्रकाश पोचत नाही, सदोष ड्रेनेज सिस्टम आणि असलेल्या पर्जन्य वाहिनींमध्ये शौचालयाचे सांडपाणी थेट जोडल्याने, तसेच रस्त्यावर कचरा फेकण्याच्या सवयीमुळे होणारी तापाची, मलेरियाची साथ या समस्यांवर देखील चर्चा करण्यात आली. घरे बांधण्याची परिस्थिती अशीच राहिली तर पाण्याची पाईपलाईन देखील गटार समान होईल असा गर्भित इशारा महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी या वेळी दिला.

या  बैठकीला डॉ आदिल पटेल, नगरसेविका प्रतीमा  खोपडे, कार्यकारी अभियंता  कुलकर्णी, वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय,सचिव राजहंस लाकडे, शिवसेनेचे उपविभागप्रमुख  राजेश शेट्ये ,कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, डॉ.चारुल भानजी, डॉ राजू जावळे, डॉ. विशाल पुंडे, डॉ मल्लिनाथ, डॉ. फातिमा शेख, डॉ सय्यद, डॉ रमेश वेसावकर, डॉ. कुणाल वेसावकर यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्र