कोरोना काळात घटले डॉक्टरांचे वजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:06 AM2021-05-27T04:06:25+5:302021-05-27T04:06:25+5:30
मुंबई : कोरोना काळात १४ महिन्यांहून अधिक काळ काम करणाऱ्या डॉक्टरांच्या स्वास्थ्यावरही परिणाम झाला आहे. तासनतास पीपीई किट्स घालून ...
मुंबई : कोरोना काळात १४ महिन्यांहून अधिक काळ काम करणाऱ्या डॉक्टरांच्या स्वास्थ्यावरही परिणाम झाला आहे. तासनतास पीपीई किट्स घालून राहणे, आहाराच्या अनियमित वेळा, झोप पूर्ण न होणे, सततचा ताण या सर्वांमुळे रात्रंदिवस काम कऱणाऱ्या डॉक्टरांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत आहे. या सगळ्या ताणामुळे डॉक्टरांचे वजन घटल्याचेही समोर येत आहे.
बऱ्याचदा कोरोना कक्षात निवासी डॉक्टरांना तासनतास काम करावे लागते. त्यामुळे आठ - नऊ तास पीपीई किट घालून काम करणे आणि दरम्यान तहान लागली तरी पाणी न पिणे, खाण्यास बंदी असणे, प्रचंड घाम येणे, त्वचाविकारांच्या समस्या अशा एक ना अनेक तक्रारींना डॉक्टरांनाही तोंड द्यावे लागते.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. अशा वेळेस डॉक्टरांना १२ तासांची ड्युटी करावी लागली. या काळात कामाचा वाढलेला व्याप, त्यामुळे होणारी धावपळ यामुळे डॉक्टरांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसून आले. याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, कोरोना कक्षात बऱ्याचदा निवासी डॉक्टर अधिक तास काम करतात. या काळात त्यांनी पीपीई किट्समुळे खूप घाम येतो. तसेच, घाम आल्याने शरीरातील पाणी कमी होते, पीपीई किट अंगावर असताना पाणी पिण्याची वा काहीही खाण्याची मुभा नसते.
आहार व व्यायामावर भर देण्याचा प्रयत्न
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कोविड केंद्रात रुग्णसेवा करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येमुळे कामाचा व्यापही वाढला होता. त्यावेळी अतिरिक्त वेळ केंद्रात थांबावे लागत होते. यामुळे जेवणाच्या वेळा, झोपेच समीकरण बिघडले होते. परिणामी वजनात ३-४ किलो घट झाली आहे. सध्या सकस आहार आणि व्यायामावर भर देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, धावपळ होत असली तरीही रुग्णसेवेलाच प्राधान्य आहे.
डॉ. शंकर खरोडे, नेस्को कोविड केंद्र
सततच्या दुर्लक्षामुळे आरोग्याच्या तक्रारी
मागील दीड वर्ष रुग्णसेवेमुळे आमच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. आरोग्याकडे सततचे दुर्लक्ष झाल्यामुळे वजन कमी झाल्याचे दिसून आले होते. परंतु, वेळ मिळेल तेव्हा योगासन, ध्यानधारणा याकडे लक्ष देणे सुरू आहे. शिवाय, आहाराच्या वेळा पाळण्याकडेही लक्ष देत आहे.
झोप, आहारामुळे समस्या
कोरोना रुग्णांवर उपचार करणारे सेव्हन हिल्स पहिले रुग्णालय आहे. या रुग्णालयाने हजारो रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. मात्र, कामाचा सतत ताण असल्याने झोप आणि आहार याचा समतोल राखता आला नाही. त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या कायमच भेडसावत असतात. परंतु, त्यातूनही मोकळा वेळ मिळेल तेव्हा आवडीच्या गोष्टी करणे, सकस आहार घेणे, झोप घेण्याचा प्रयत्न सुरू असतो.
- डॉ. दीप्ती शहा, सेव्हन हिल्स रुग्णालय
त्रिसूत्री महत्त्वाची
शारीरिक स्वास्थ्यासाठी योग्य आहार, झेपेल इतकाच व्यायाम आणि पुरेशी झोप ही महत्त्वाची त्रिसूत्री आहे. आता सर्वच क्षेत्रात ही अनियमितता आली आहे. आपण तर ताण - तणाव सहन करतोच. पण, बदलत्या जीवनशैलीने आपण आजार ओढवून घेत आहोत. सध्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार असे अनेक कर्मचारी कोविड योद्धे अविरतपणे कोरोनाविरोधात लढत आहेत. मात्र, कोरोना विरूद्ध लढाई जिंकण्यासाठी या कोविड योध्द्यांनी आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे.
- डॉ. निरंजन सोमण, आहारतज्ज्ञ