लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : समुद्रातील महत्त्वपूर्ण पक्षी आणि जैवविविधतेचे भविष्यातील धोके ओळखून संशोधनाच्या गरजांवर चर्चा करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि बर्ड लाइफ इंटरनॅशनल बीएनएचएसने उत्तर हिंद महासागरातील समुद्री पक्ष्यांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यावेळी समुद्री पक्ष्यांच्या हालचालींच्या दस्तऐवजीकरणावर अधिक भर दिला जाणार आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि बर्डलाइफ इंटरनॅशनल बीएनएचएसने उत्तर हिंद महासागरातील समुद्री पक्ष्यांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन केले आहे. राज्य सरकार, तसेच केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विविध देशांतील संशोधक या कार्यशाळेत महत्त्वाच्या समुद्री पक्षी क्षेत्र आणि त्यांचे स्थलांतर यावर चर्चा करण्यासाठी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.मुंबई बीएनएचएसच्या फोर्ट येथील हॉर्नबिल हाऊसमध्ये येत्या ७ ते ९ जूनदरम्यान ही तीनदिवसीय कार्यशाळा होणार आहे. समुद्री पक्ष्यांच्या हालचालींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी उपलब्ध माहिती एकत्र आणणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. भारताच्या सागरी क्षेत्रात समुद्री पक्ष्यांच्या हालचालींचे विहंगावलोकन नकाशाच्या माहितीसोबत समुद्री पक्ष्यांना असलेल्या महत्त्वपूर्ण धोक्यांची माहिती गोळा करणे आणि संवर्धनासाठी आवश्यक कृतीची माहिती देण्यासाठी संशोधनातील कमी ओळखण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची असल्याचे बीएनएचएसच्या उपसंचालक डॉ. पी. सथियासेल्वम यांनी सांगितले.
धोरणासाठी ठरणार उपयुक्त
ही कार्यशाळा महत्त्वाची पक्षी क्षेत्रे आणि त्यातील महत्त्वाचे दुवे शोधून, तसेच भविष्यातील व्यवस्थापन आणि संशोधन गरजांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख धोके ओळखून समुद्री पक्षी आणि सागरी संरक्षणाशी संबंधित धोरण आणि निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.