अनिल देशमुखांविरोधातील तपासासाठी सीबीआयकडे कागदपत्रे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:05 AM2021-09-03T04:05:35+5:302021-09-03T04:05:35+5:30
मुंबई : पोलीस नियुक्त्या व बदल्यांसंदर्भात झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेला अहवाल व त्यासंबंधीची ...
मुंबई : पोलीस नियुक्त्या व बदल्यांसंदर्भात झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेला अहवाल व त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे सीबीआयला सुपूर्द करण्यात आली आहेत, अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.
या कागदपत्रांची पडताळणी करून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व कागदपत्रे देण्यात आली की नाही, हे तपासायचे आहे. त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत द्यावी, अशी विनंती सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाला केली.
अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करण्यासाठी रश्मी शुक्ला यांचा अहवाल व त्यासंबंधीची कागदपत्रे देण्यास राज्य सरकार तयार नाही. राज्य सरकार तपासाला सहकार्य करण्यास तयार नसल्याचा आरोप करत सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सुरुवातीला राज्य सरकारने सीबीआयला कागदपत्रे देण्यास नकार दिला. सीबीआयने मागितलेल्या कागदपत्रांचा आणि देशमुख यांच्या विरोधातील तपासाचा काहीही संबंध नसल्याचे राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले होते.
गेल्या महिन्यात न्यायालयाने राज्य सरकारला त्यांच्याकडील कागदपत्रे सीबीआयला न देण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राज्य सरकारने काही कागदपत्रे सीबीआयला देण्याची तयारी दर्शवली. न्यायालयाने सीबीआयची विनंती मान्य करत या याचिकेवर दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवली.