Join us

आरती देशमुख यांच्याकडून ईडीकडे कागदपत्रे सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला गैरहजर राहणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला गैरहजर राहणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी ईडीला आवश्यक असलेली कागदपत्रे सुपुर्द केली आहेत. ईडीकडून ४.२० कोटींची मालमत्ता जप्तीची कारवाई शुक्रवारी करण्यात आली, त्याच दिवशी त्यांनी वकिलामार्फत कागदपत्रे दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीच्या रडारवर असलेल्या अनिल देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येत आहे. त्यानुसार आरती देशमुख यांना १५ जुलैला ईडी कार्यालयात दाखल राहण्याचे समन्स बजविले होते. मात्र, प्रकृती व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्या कार्यालयात हजर राहू शकल्या नव्हत्या. त्याऐवजी त्यांनी आवश्यक दस्तऐवज देऊन चौकशीला सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार ईडीने अधिकृत व्यक्तीमार्फत कागदपत्रे सादर करण्यास सांगितल्यानंतर ॲड. इंदरपाल सिंग यांनी शुक्रवारी संबंधित कागदपत्रे ईडी कार्यलयात सादर केली आहेत. त्याबाबत काही संशयास्पद वाटल्यास अनिता यांना ईडी चौकशीसाठी पुन्हा पाचारण करू शकते.