बंद गिरण्यांमध्ये डासांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 01:54 AM2019-04-21T01:54:34+5:302019-04-21T01:54:42+5:30
महापालिका पाडणार धोकादायक भाग; लोअर परळ परिसरात सर्वाधिक उतप्ती
- शेफाली परब-पंडित
मुंबई : एकेकाळी मुंबईचे वैभव असलेल्या गिरण्या बंद पडल्यानंतर डासांचे उत्पत्ती स्थळ बनू लागल्या आहेत. परिणामी मान्सूनमध्ये डेंग्यू, मलेरियाचा आजार पसरण्याचा धोका वाढत आहे. यामुळे गिरणातील धोकादायक भाग पाडून डासांचे अड्डे मान्सूनपूर्वी नष्ट करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्या पोसल्या जातात. मुख्यत: बांधकामांच्या ठिकाणी याचा सर्वाधिक धोका असतो. लोअर परळ येथील सीताराम मिल, मधुसुदन मिल, पोद्दार मिल आणि अपोलो मिलच्या जागेत गेल्या काही मान्सून काळात डासांच्या उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे आसपासच्या परिसरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले. हा धोका यंदाच्या पावसाळ्यात टाळण्यासाठी या गिरण्यांमधील धोकादायक बांधकाम पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
यासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून महापालिकेने परवानगी घेतल्यानंतर गिरणीतील बांधकाम पाडण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून बांधकाम पाडण्याचा खर्च संबंधित गिरणमालकांकडून वसूल करण्यात येणार आहे. मात्र काही गिरण्यांचा समावेश पुरातन वास्तू समितीच्या यादीत आहे. त्यामुळे मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीचा हिरवा कंदिल मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाही होणार आहे.
टेक्सटाईल म्युझिम कागदावरच
दक्षिण मध्य मुंबईतील बंद गिरण्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. तसेच या ठिकाणी गर्दुल्ले व लुटरुंचाही वावर वाढत आहे. त्याचबरोबर गिरण्यांमधील धोकादायक भाग कोसळण्याचीही शक्यता आहे. यामुळे टेक्सटाईल म्युझिम स्थापन करण्याचा कल्पना २००९ मध्ये महापालिकेने आखले. मात्र अद्याप हा प्रकल्प साकार झालेला नाही.
पुरातन समितीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत
गिरण्यांमधील धोकादायक भाग पाडण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराला कार्यादेश दिले आहेत. मात्र यापैकी काही इमारती पुरातन वास्तू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीने पाहणी करुन निर्णय घेतल्यानंतरचं गिरणीतील धोकादायक भाग पाडण्यात येईल, असे जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी सांगितले.