Join us  

दारोदारी सर्वपक्षीय धावपळ

By admin | Published: October 13, 2014 2:00 AM

निवडणूक प्रचारासाठी अखेरचा रविवार असल्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची आज शहरात धावपळ उडाली होती.

नवी मुंबई : निवडणूक प्रचारासाठी अखेरचा रविवार असल्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची आज शहरात धावपळ उडाली होती. प्रत्येक विभागात पदाधिकारी रॅली काढून व घरोघरी जावून उमेदवाराचा प्रचार करत होते. प्रत्येक मतदाराची वैयक्तिक भेट घेण्यावर कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. आचारसंहिता सुरू झाल्यापासून सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे, प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या उमदेवारांनी दोन ते तीन वेळा पत्रके घराघरामध्ये पोहचविली आहेत. परंतु शहरातील बहुतांश नागरिक नोकरीनिमित्त सकाळी घर सोडत असून रात्री उशिरा घरी येत असतात. यामुळे प्रचारादरम्यान नागरिकांची थेट भेट होत नाही. प्रचारासाठी अखेरचा रविवार असल्यामुळे सर्वच पक्षांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. शिवसेनेने बेलापूर व ऐरोलीमध्ये मोटारसायकल रॅली व पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले. पक्षाचे इतर पदाधिकारी घरोघरी जावून प्रचार करत होते. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक व इतर पदाधिकारी घरोघरी जात होते. प्रत्येक नागरिकाला आवाहन करण्यात येत होते. राष्ट्रवादी, काँगे्रस, शिवसेनेचे पदाधिकारी आपलाच उमेदवार कसा शहराचा विकास करू शकतो हे सांगत होते. सर्वच पक्षाचे पदाधिकारी घरोघरी जात होते. प्रकल्पग्रस्त कृती समितीचे डॉ. राजेश पाटील यांनीही कार्यकर्त्यांसह घरोघरी जाण्यावर भर दिला. प्रकल्पग्रस्त व इतर नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या कामांची माहिती दिली जात आहे.