कुणी घर देता का घर? गुंतवणूक केलेल्या पोलिसांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 08:45 AM2022-07-28T08:45:54+5:302022-07-28T08:46:13+5:30

मेगा टाउनशिपमध्ये गुंतवणूक केलेल्या पोलिसांची व्यथा

Does anyone give a house? Agony of Invested Police | कुणी घर देता का घर? गुंतवणूक केलेल्या पोलिसांची व्यथा

कुणी घर देता का घर? गुंतवणूक केलेल्या पोलिसांची व्यथा

googlenewsNext

मनीषा म्हात्रे 

मुंबई : मुंबई पोलीस दलात २१ वर्षे सेवा बजावली. मुंबईसारख्या मायानगरीत स्वतःचे घर असावे म्हणून पोलिसांसाठी असलेल्या मेगा सिटी टाऊनशिपमध्ये गुंतवणूक केली. निवृत्तीनंतर मुलगा पोलीस दलात रुजू झाला. थाटामाटात विवाह पार पडला. मात्र, मुलाच्या संसारात अडचण ठरताच पोलीस मुलाने निवृत्त पोलीस आई-वडिलांना घराबाहेर काढले. मेगा सिटीचाही प्रकल्प मार्गी लागत नसल्यामुळे नटसम्राट चित्रपटातील  ‘कुणी घर देता का घर ?’ या प्रसिद्ध डायलॉगप्रमाणे गाशा गुंडाळून निवृत्त पोलिसाने पत्नीसोबत गावी बस्तान मांडले.  मात्र, आजही हक्काच्या घरात जाण्याच्या वाटेकडे ते डोळे लावून आहेत. त्यांच्यासारख्या जवळपास सात हजारांहून अधिक जणांवर अशाच प्रकारे घर घर करण्याची वेळ आली आहे,  याच मेगा टाऊनशिपमध्ये गुंतवणूक केलेल्या पोलिसांची व्यथा. 

पाठपुरावा सुरू... 
पोलीस अंमलदार दिलीप शिंदे सांगतात, आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. कोरोनाच्या काळात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष झाले. प्रशासनाने वेळीच दखल घेत प्रकल्प मार्गी लावून आम्हाला वेळीच घराचा ताबा द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच संस्थेने वेळीच वार्षिक बैठक घेऊन सभासदाचे प्रश्न मार्गी लावावे. 

मरणापूर्वी तरी घरात जाऊद्यात... 
कोल्हापूरचे रहिवासी असलेले मारुती कदम (६७) सांगतात, २०१४ मध्ये पोलीस दलातून निवृत्त झालो. मेगा टाऊनशिपमुळे कमी किमतीत हक्काच्या घराचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली. एफडी मोडून २०१२ मध्ये १ लाख २० हजार जमा केले. त्यानंतर, २०२० मध्ये नवीन परिपत्रकाप्रमाणे तत्काळ १ लाख ८० हजार भरण्यास सांगितले. एफडी मोडून तेही पैसे भरले. मात्र, फक्त जागेभोवती कुंपण चढले. त्यामुळे पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत. मुंबईत राहायला घर नसल्यामुळे वृद्ध पत्नीसोबत गावी राहतो. मिळणाऱ्या पेन्शनमधून दिवस काढत आहे. त्यामुळे किमान जिवंत असेपर्यंत हक्काच्या घरात जाऊद्यात, असेही त्यांनी नमूद केले आहे. 

..पतीचीही साथ सुटली...
घाटकोपर परिसरात राहणारे बावधाने कुटुंबीय. कोरोनाच्या काळात २०२० मध्ये पोलीस अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना धोंडीबा बावधाने (वय ४७) यांचे निधन झाले. चार मुली आणि एका मुलाची जबाबदारी त्यांची पत्नी मनीषा बावधाने यांच्या खांद्यावर आली.  अपत्यांची संख्या अधिक असल्यामुळे अनुकंपा तत्त्वावर नोकरीही मिळाली नाही. अशा परिस्थितीत मिळणाऱ्या पेन्शनमधून कुटुंबाचा गाडा ओढत असताना, पतीने कुटुंबीयांच्या भविष्यासाठी मेगा टाऊनशिपमध्ये गुंतवणूक केल्याचे समजले. मात्र, ते घर मिळण्यासही विलंब होत असल्याने पदरी निराशाच पडत असल्याचे मनीषा यांनी सांगितले. शासनाने वेळीच दखल घेत प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

आबा असते तर... 
निवृत्त एएसआय धुरी सांगतात, ३१ वर्षे सेवा बजावली. आर. आर. पाटील यांनी पोलिसांना हक्काचे घर मिळावे म्हणून मेगा टाऊनशिपचे स्वप्न साकारले. त्यानुसार, गुंतवणूक केली. मात्र १० वर्षे उलटली तरी मुहूर्त लागत नसल्याने अनेक सहकारी पैसे काढून घेत आहेत. त्यांना पैसे देताना त्यातून व्याज तर दूरच, दोन ते तीन हजार रुपये कमी करून देण्यात येत आहेत. सुरुवातीला १० लाखांत मिळणारे घर २१ लाखांपर्यंत पोहोचले. आज आर. आर. पाटील म्हणजेच आमचे आबा असते हा प्रकल्प रखडला नसता.

Web Title: Does anyone give a house? Agony of Invested Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.