पी/नॉर्थला कुणी सहायक आयुक्त देतं का...सहायक आयुक्त?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:08 AM2021-07-07T04:08:06+5:302021-07-07T04:08:06+5:30
मुंबई : मालाड मालवणी परिसरात बांधकाम कोसळून झालेल्या मनुष्यहानी नंतरदेखील येथील प्रशासकीय व्यवस्था ढिसाळ कारभार करत आहे. कारण गेल्या ...
मुंबई : मालाड मालवणी परिसरात बांधकाम कोसळून झालेल्या मनुष्यहानी नंतरदेखील येथील प्रशासकीय व्यवस्था ढिसाळ कारभार करत आहे. कारण गेल्या पाच महिन्यांपासून मालाड, मालवणी परिसरासह उर्वरित परिसराचा समावेश असलेल्या पी/नॉर्थला सहायक आयुक्त नसल्याचे चित्र आहे. परिणामी येथे अनधिकृत झोपड्यांचे जंगल दिवसागणिक उभे राहत असून, त्यावर कारवाई मात्र शून्य आहे.
फाईट फॉर राईट फाउंडेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, पी/नॉर्थचे तत्कालीन सहायक आयुक्त संजोग कबरे यांची फेब्रुवारी महिन्यात विशेष उपायुक्त या पदावर पदोन्नती करण्यात आली. त्यानंतर पाच महिने येथे कोणीच कार्यरत नाही. त्यामुळे कोरोना काळात आणि पावसाळ्यात नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत आहे. याच काळात १० जून रोजी मालवणी येथे बांधकाम कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. एका घराची भिंत कोसळली. मास्टरजी कंपाउंड येथे गोदामाला आग लागली.
मालाड सबवे मध्ये सातत्याने पाणी साचल्याने येथे रहदारी बंद होत आहे. पोयसर नदीलगत अनधिकृत गाळे उभे राहत आहेत. हे सगळे होत असताना सहायक आयुक्तच नसल्याने काहीच कारवाई झाली नाही. पी/नॉर्थ हा मुंबईतला सर्वांत मोठा विभाग आहे. यात तीन विधानसभा मोडतात. मालाड पश्चिम, दिंडोशी आणि कांदिवली पूर्व याचा यात समावेश आहे. मात्र, प्रशासन येथील समस्यांकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे, असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद घोलप यांनी नमूद केले.
आर-साऊथचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांच्याकडे पी/नॉर्थचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असला तरी देखील एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सहायक आयुक्त मिळू नये; याबाबत स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार, ई विभागाचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर यांची बदली पी/नॉर्थमध्ये सहायक आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून याबाबतचे अधिकृत पत्र प्राप्त झालेले नाही.