मुंबई : अवयवदानाविषयी काही वर्षांत जनजागृतीसाठी अनेक प्रयत्न केले गेले; परंतु अजूनही या प्रयत्नांना पुरेसे यश आले नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून निदर्शनास येते. राज्यभरात सहा हजारांहून अधिक रुग्णांना किडनीची तर १३०० जणांना यकृताची प्रतीक्षा आहे.
२०२० पासूनची आकडेवारी पाहिली असता अवयदानाच्या चळवळीला २०२३ या वर्षामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी १४८ जणांनी अवयवदान केले.
प्रतीक्षा यादीवरील रुग्णाची संख्या पाहता अवयवांची गरज मोठी असून, दानाचा आकडा वाढणे गरजेचे आहे. गेल्या वर्षीच्या अवयवदानाच्या तुलनेत अवयवदान वाढले ही समाधानाची बाब आहे; मात्र, यापेक्षा अधिक अवयवदान होऊ शकते. सर्व स्तरावर अवयवदान वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. सुजाता पटवर्धन, संचालिका, राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था.
अवयवनिहाय प्रतीक्षा यादीकिडनी ६१०२ यकृत १३६० हृदय ११५ फुप्फुस ४६ स्वादुपिंड २९ छोटे आतडे ०२
तीन वर्षांतील आकडेवारी२०२३ १४८ २०२२ १०५ २०२१ ९५
प्रतीक्षा यादीवर नजर टाकली असता किडनीची सर्वाधिक मागणी आहे. डायलिसिसवर अनेक जण आहेत. ज्या घरातील नातेवाईक पुढे येऊन किडनी देतात त्यांचे प्रत्यारोपण होते आणि ते सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगतात; ज्यांच्या घरात कुणी वैद्यकीय किंवा अन्य कारणास्तव किडनी देऊ शकत नसेल तर त्या व्यक्तीला प्रतीक्षा यादीवर अवलंबून राहावे लागते. - डॉ. श्रीरंग बिच्छू, ज्येष्ठ किडनी विकारतज्ज्ञ, बॉम्बे हॉस्पिटल