- गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : ‘पिण्याच्या पाण्यासाठी अर्ज करून चार महिने होत आले, मात्र अद्याप मला नळजोडणी देण्यात आलेली नाही’... गोरेगावमधील कर्क रोगग्रस्त वृद्धाने ‘लोकमत’कडे मांडलेली ही व्यथा.गोरेगाव पश्चिमच्या मोतीलालनगरमध्ये अन्सारअली कुरेशी (६५) हे त्यांची पत्नी, मुलगा मकसुद, सून आणि नातवंडासोबत राहतात. कुरेशी हे घशाच्या कर्क रोगाने पीडित आहेत. तसेच त्यांच्या सुनेवरदेखील गेल्या दिवाळीदरम्यान हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळजोडणीसाठी त्यांनी नोव्हेंबरमध्ये (IDN NO: PSIDN860027) अर्ज केला होता. मात्र, चार महिने होत आले तरी त्यांना नळजोडणी मिळालेली नाही. कुरेशी यांचा मुलगा मकसुद हा खासगी आस्थापनात नोकरी करतो. तोही दोन वेळा कामाचा खाडा करून पालिकेत अधिकाºयांना भेटण्यासाठी गेला. परंतु अधिकारी काहीच दाद देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्यांनी पालिकेत जमा केली आहेत.घरी आजारी आणि वृद्ध व्यक्तीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे कामाची वारंवार सुटी करून पालिकेच्या खेपा घालणे त्यांना परवडत नाही. मात्र, जलविभागातील अधिकाºयांना यामुळे काहीच फरक पडत नसल्याचे उघड आहे. मोतीलालनगरमधील अनेक लोकांची कामे पालिका अधिकाºयांनी तीन ते चार महिने किंवा त्याहून अधिक काळ अडवली आहेत. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाºयांनी यात लक्ष घालण्याची विनंती स्थानिकांनी केली आहे.पाण्यासाठीमहिना १५ हजार!‘माझे वडील कर्क रोगाने, तर माझी पत्नी ही हृदयरोगाने त्रस्त आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मी हयगय करू शकत नाही. परिणामी मला टँकर मागवावा लागतो. ज्याची किंमत ५०० रुपये असून दिवसाआड मला तो मागवावाच लागतो. त्यामुळे परवडत नसतानादेखील पिण्याच्या पाण्यासाठी महिना १५ हजार रुपये मला खर्च करावे लागत आहेत.तीन वर्षे गोरेगावच्या मोतीलालनगरमध्ये पिण्याचे पाणी गढूळ येत होते. ते घेऊन आम्ही पी दक्षिण विभागाच्या साहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांना भेटण्यासाठी गेलो. मात्र, त्यांनी भेट नाकारली. त्यानंतर जलविभागाने आम्हाला नवीन जोडणी घेण्याचा सल्ला दिला. मात्र, प्लंबरकडून अव्वाच्या सव्वा खर्च आकारला जात असल्याने त्याला पर्याय आम्ही विचारला. तेव्हा तुम्ही थेट आमच्याकडे या असे आम्हाला सांगण्यात आले. थेट गेल्यानंतरही अधिकाºयांकडूनच ‘अमक्या प्लंबरला भेटा’ असे सांगण्यात आले. पालिकेच्या या पद्धतीमुळे गोरेगाव मोतीलालनगरचे रहिवासी हैराण झाले आहेत.- नीलेश प्रभू, सहसचिव, मोतीलालनगर विकास समिती
कुणी पाणी देता का... पाणी! कर्क रोगग्रस्त वृद्धाची व्यथा, नळजोडणीसाठी चार महिन्यांपासून झीजवताहेत पालिकेच्या पाय-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 3:43 AM