दोन, पाच लिटर शुद्ध हवा कोणी विकत देता का...?

By अतुल कुलकर्णी | Published: November 6, 2023 08:12 AM2023-11-06T08:12:32+5:302023-11-06T08:12:46+5:30

एका स्ट्रीपवर दुसरी स्ट्रीप फ्री आहे. त्यामुळे रोज एक गोळी घेतली तरी चालेल... मुंबईसाठी हे चपखल उदाहरण आहे.

Does anyone sell two, five liters of pure air...? | दोन, पाच लिटर शुद्ध हवा कोणी विकत देता का...?

दोन, पाच लिटर शुद्ध हवा कोणी विकत देता का...?

- अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई) 

गेले काही दिवस कविवर्य अशोक नायगावकर यांनी सांगितलेल्या एका प्रसंगाची आठवण येत आहे. सुट्टी लागली म्हणून ते गावाकडे गेले. गावात सगळीकडे फिरून आले. सुट्टी संपल्यावर मुंबईत आले. दुसऱ्याच दिवशी अचानक त्यांना त्रास होऊ लागला. मळमळ होत होती. डोके दुखत होते, म्हणून ते डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सगळी हिस्ट्री विचारली. नायगावकर म्हणाले, आठ दिवस गावाकडे राहून आलो. ते ऐकताच डॉक्टरांना आजारपणावरचा उपाय सापडला. ते म्हणाले, बरोबर आहे. तुम्हाला निसर्ग बाधला आहे. फार गोळ्या, औषधाची गरज नाही. सकाळी पायी फिरायला जाताना नालीच्या कडेने फिरा. बसस्टॉपवर गाडी पकडण्यासाठी किमान एक तास उभे राहा. मुंबईच्या अशुद्ध हवेचा पुरवठा तुम्हाला कमी पडला आहे. रोज सकाळी टॉवरच्या गच्चीवर जाऊन दीर्घ श्वास घ्या. धूलिकणयुक्त हवा पोटात गेली की, तुम्हाला आराम पडेल. फार वाटले तर विटामिनच्या गोळ्यांवर स्कीम आली आहे. एका स्ट्रीपवर दुसरी स्ट्रीप फ्री आहे. त्यामुळे रोज एक गोळी घेतली तरी चालेल... मुंबईसाठी हे चपखल उदाहरण आहे.

मेरी कमीज से तेरी कमीज सफेद कैसे..? असे म्हणत मुंबईने दिल्लीच्या पुढे पाऊल टाकले आहे. त्याचे मुंबईकरांना कसले कौतुकच नाही. विकासाची कामे स्वत:च्या घरापासून सुरू करायची असतात, याचा आदर्श मुंबई महापालिकेने ठेवला आहे. महापालिकेच्या मुख्यालयाजवळ, आजूबाजूलाच रस्त्याचे, मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे धुळीचे कण आनंदाने उंच उंच उडत आहेत. त्याचे कौतुक करायचे सोडून तक्रारी करण्याचा मुंबईकरांचा स्वभाव कधीपासून झाला..? मुंबईकर सहनशील आहेत. मुंबईकरांचे स्पिरिट वेगळे आहेत. ते स्पिरिट या धूळभरल्या हवेत कमी पडले की काय...? हाच प्रश्न सध्या प्रशासनाला पडला आहे.

आता शहराचा विकास करायचा म्हणजे, केवळ तुम्ही घाम गाळून कमावलेल्या पैशांतून मिळणारा कर पुरेसा नसतो. तुम्ही दिलेल्या करातून दोन-चार पूल उभे राहतील. त्यापेक्षा जास्त काय होणार..? मात्र, लोंढेच्या लोंढे मुंबईत येत असताना त्यांच्यासाठी घरांची सोय करावी लागेल. एसआरएअंतर्गत झोपड्या पाडून बिल्डरांच्या मार्फत टॉवर्स उभे करावे लागतील. ते करताना बांधकाम करावे लागेल. एकाच वेळी जमिनीच्या खालून आणि जमिनीच्या वरून काम करणारे मोठे खासगी बिल्डर्स आणावे लागतील. मुंबईला गतिमान करण्यासाठी त्यामुळे होत प्रदूषणाकडे दुर्लक्ष करावे लागेल. शेवटी हा प्रदूषणाचा भारदेखील तुम्हालाच वाहून न्यावा लागेल.

विकासाची फळे उगाच गोड नसतात बच्चनजी... त्यामुळे मुंबईचे प्रदूषण वाढल्याची किरकिर करण्यात अर्थ नाही. उलट आपण दिल्लीच्याही पुढे गेलो यात धन्यता मानायला हवी. कुठल्या तरी विषयात आपण दिल्लीला मागे टाकले हेही नसे थोडके...
मुंबई महापालिकेचे पाहून प्रदूषण नियंत्रण मंडळही गाढ झोपेतून उठले आहे. याचे काही कौतुकच नाही. त्यांनी आता काही कंपन्यांना नोटिसा देणे सुरू केले आहे. म्हणजे आता त्या कंपन्या बंद पडणार... लोक बेरोजगार होणार... लोकांना काम मिळणार नाही... त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार...

एका नोटिशीमुळे एवढे सगळे घडू नये, असे वाटत असेल, तर मुंबईकरांनी धुळीने भरलेल्या हवेकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आणि मुंबई महापालिकेकडे पाहण्याची दृष्टीसुद्धा बदलली पाहिजे... अन्यथा विकासाचा गाडा मुंबईत पसरलेल्या खड्ड्यांमध्ये रुतून बसायचा... सगळे काही सरकारने, महापालिकेने, विविध यंत्रणांनी करायचे... तर मग तुम्ही काय करणार..? तुम्ही उलट धूळयुक्त हवा घेऊन ताजेतवाने कसे राहायचे, याचे क्लासेस लावले पाहिजेत. त्यासाठीची काही औषधे असतील तर ती शोधली पाहिजेत. वेळ पडली तर रामदेव बाबांना सांगून मुंबईकरांसाठी वेगळ्या पद्धतीचा प्राणायाम आहे का? हे विचारले पाहिजे. सगळ्यात जास्त ज्या आझाद मैदानाभोवती धूळयुक्त हवा आहे, तिथेच प्राणायाम क्लासेसचे आयोजन केले पाहिजे. म्हणजे प्राणायामही शिकता येईल आणि प्रॅक्टिकल अनुभवदेखील मिळेल. 

परवा महापालिकेचे एक अधिकारी सांगत होते. तुम्हा पत्रकारांना चांगले काही दिसतच नाही. मुंबईत बांधकामे आज सुरू आहेत का..? गेली अनेक वर्षे बांधकामे होत आहेत. धुळीचे लोट आकाशात जातात. आकाशातून फिरणाऱ्या वैमानिकांना मुंबईची धावपट्टी नेमकी कुठे आहे, हे याच धुळीच्या लोटांमुळे पटकन समजते. ही आपली वेगळी ओळख पुसून टाकली तर उद्या एखादे विमान कोणाच्या घरावर किंवा मुंबईच्या रस्त्यावर उतरले तर किती पंचाईत होईल... पण आता नाईलाजाने तुमची ओरड खूपच वाढू लागली म्हणून मुंबई महापालिकेने ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते रोज पाण्याने धुवायचे ठरवले आहे. आता एवढ्या रस्त्यांना किती लिटर पाणी रोज लागेल? याचा हिशोब करून दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी मिळत नसताना, मुंबई महापालिकेने पाण्याची उधळपट्टी सुरू केली आहे असे म्हणायला तुम्ही मोकळे व्हाल... याची आम्हाला खात्री आहे; पण आमचे काम किती वाढले हे तुम्हाला दिसणार नाही. आता रोज किती लिटर पाणी वापरले त्याचा हिशोब ठेवावा लागेल.

पिण्याचे पाणी वापरायचे नाही, म्हणून रस्ते धुण्याकरिता विहिरी, तलाव या ठिकाणचे पाणी विकत आणावे लागेल. त्यासाठी टँकर लावावे लागतील. टँकरसोबत करार करावा लागेल. त्याचाही हिशोब ठेवावा लागेल. सगळे रस्ते धुवून झाले तुम्ही पुन्हा पाण्यावर पाण्यासारखा किती पैसा खर्च केला हे विचारणारच... म्हणून आम्हाला तुमच्यासाठी हिशोब ठेवण्याची ही सगळी कामेदेखील करावी लागतील... 
तुम्हाला एवढे वाटतच असेल तर दोन, पाच लिटरसुद्धा हवा कोणी विकत देता का बघा? देत असेल तर तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांसाठी घ्या... पैसे उरलेच तर आमच्यासाठीदेखील घेऊन या. मात्र, किरकिर करू नका... असा मूलमंत्र मुंबई महापालिकेने मुंबईकरांना दिला आहे. तमाम महामुंबईकरांना दिवाळीच्या प्रदूषणयुक्त शुभेच्छा..!

Web Title: Does anyone sell two, five liters of pure air...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.