मुंबई- गेल्या काही दिवसापूर्वी दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांनी आर्थिक संकटातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देसाई यांच्या आत्महत्येवरुन भाजपवर टीका केली होती. आता आज या आरोपला भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले.
“एकनाथ शिंदे असो वा अजित पवार भाजप लिहून देईल, तसे बोलतात”; संजय राऊतांचा आरोप
आमदार आशिष शेलार म्हणाले, नितिन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात दोषींना वाचवायला मदत करताय का? नितीन देसाई यांच्या मृत्यूचे राजकारण करता कामा नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूला, आत्महत्येला जे जबाबदार आहेत, जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण माझा सवाल आहे की, संजय राऊत किंवा उद्धवजी तुम्ही नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला गेलात का? त्यांचे अंतदर्शन घेतलेत का? का शोकभावना प्रगट केल्या नाहीत?, असा सवालही शेलार यांनी केला.
देसाई यांच्या परिवाराला भेटलात का? का नाही भेटलात? राजकारण करायची आमची इच्छा नाही, पण आज तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून विचारावे लागते की, कोणी तुम्हाला नितीन देसाई यांच्या परिवाराला भेटण्यापासून थांबवलं? यासंबंधीचा प्रश्न मी, महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडला. देवेंद्रजींनी कारवाईचे आदेश दिले. एफआयआर दाखल झाला, जे दोषी आहेत ते स्वतःची अटक वाचविण्यासाठी धावत आहेत. पण त्यावेळी विधानसभेमध्ये उद्धवजी तुमच्या पक्षाचा एकही आमदार का बोलला नाही? म्हणजे हे सगळं तुम्ही जे दोषी आहेत रशेष शहा आणि त्यांच्या माणसांना मदत करण्यासाठी करताय का? हा आमचा आरोप आहे, असंही शेलार म्हणाले.