Join us

डोळे आलेल्यांकडे पाहिल्याने खरोखरच डोळे येतात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:27 PM

३,४९० रुग्णांना झाला संसर्ग, काळजी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात डोळ्यांना संसर्ग होण्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांत ३,४९० रुग्णांना डोळ्याचा संसर्ग शहरात झाला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच सर्वच नागरिकांनी या संसर्गापासून काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. तसेच अनेक नागरिकांचा गैरसमज आहे की डोळे आलेल्या व्यक्तीकडे पाहिल्याने डोळे येत असल्याचे मत नेत्ररोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.    राज्यात अनेक भागात डोळे येण्याच्या तक्रारी वाढत आहेत. वैद्यकीय भाषेत याला व्हायरल कंजंक्टिव्हायटिस असे म्हणतात. नेत्रविकारतज्ज्ञांच्या मते दरवर्षी या काळात डोळ्याचे रुग्ण पाहायला मिळतात. यामध्ये काही नागरिकांना डोळे लाल होऊन चुरचुरण्याचा त्रास झाल्याचे रुग्ण पाहावयास मिळतात.डोळे येणे मुख्यत्वे ॲडीनो व्हायरसमुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे.

ड्रॉप सल्ल्याने टाका

मेडिकलवाल्यांच्या सल्ल्यानुसार कोणेतेही ड्रॉप घालू नये. कारण त्याच्यामध्ये आवश्यकता नसताना स्टिरॉइड आणि अँटिबायोटिक्स असण्याची शक्यता आहे. सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांत नेत्रविकारांचे रुग्ण वाढले आहेत.

वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे

-  हा आजार होऊ नये, म्हणून नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.यामध्ये  वारंवार हात धुणे, डोळ्याला हात न लावणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. तसेच डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे.  या आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होतो. 

- विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे. परिसर स्वच्छ ठेवून माशा, चिलटे कमी ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.डोळ्याचा संसर्ग याला सामान्य भाषेत डोळे येणे असे म्हटले जाते.

- हा आजार चार ते पाच दिवस राहतो. डॉक्टरांच्या मते जीवाणूंचा संसर्ग असेल तर मध्ये डोळा लाल होतो आणि पिवळा द्रव वाहतो. या पद्धतीचा रुग्ण साधारणपणे योग्य औषधोपचारानंतर चार ते पाच दिवसांत बरे होतात.

- फार इतर कोणत्या औषधाची गरज भासत नाही. जर विषाणूचा संसर्ग होऊन डोळे आले असतील तर त्यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

डोळ्यांचा संसर्ग झालेल्या व्यक्तींनी वापरलेल्या कोणत्याही कपड्यांना स्पर्श करू नये. सध्या दिवसाला २० ते ३० रुग्ण आम्ही पाहत आहोत. या आजाराला अजिबात घाबरण्याची गरज नाही. व्यवस्थित काळजी घेतल्यास आणि औषधोपचार केल्यास  हा आजार पाच ते सहा दिवसांत पूर्णपणे बरा होतो. प्रत्येकाने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. संसर्ग व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. तसेच डोळे आलेल्या व्यक्तीला बघून कुणाचे डोळे येत नाहीत. डोळे आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. - डॉ. चारुता मांडके, प्रभारी विभागप्रमुख, नेत्रविकारतज्ज्ञ, कूपर रुग्णालय

 

टॅग्स :डोळ्यांची निगाआरोग्यहेल्थ टिप्स