‘आजारी’च्या व्याख्येत मलिक बसतात का? उच्च न्यायालयाची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 06:53 AM2023-02-15T06:53:24+5:302023-02-15T06:53:57+5:30
मे २०२२ पासून मलिक रुग्णालयातच आहेत. पुढील आदेश देईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘पीएमएलए’अंतर्गत आजारी व्यक्तीच्या व्याख्येत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक येतात का? आणि त्याअंतर्गत ते वैद्यकीय जामिनासाठी पात्र आहेत का?, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मलिक यांच्या वकिलांकडे केली. ३० नोव्हेंबरला विशेष न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. मकरंद कर्णिक यांच्या एलकपीठापुढे मलिक यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. मलिक आजारी आहेत आणि म्हणून ते जामिनासाठी पात्र आहेत, हे आधी आम्हाला पटवून द्या. तुमच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर मी गुणवत्तेच्या आधारावर याचिकेवर सुनावणी घेऊ. तोपर्यंत त्यांना वाट पाहावी लागेल, असे न्या. कर्णिक यांनी स्पष्ट केले. मे २०२२ पासून मलिक रुग्णालयातच आहेत. पुढील आदेश देईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले.
पीएमएलएमधील ‘आजारी व्यक्ती’च्या व्याख्येत मलिक येतात का? हे जाणून घ्यायचे आहे, असे म्हणत न्यायालयाने मलिक यांचे वकील अमित देसाई व ईडीतर्फे महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांना याबाबत माहिती देण्यास सांगितले. मलिक आजारी नसून त्यांना जामीन मिळविण्यासाठी कायद्यातील दोन अटी पूर्ण कराव्या लागतील, हे मी निदर्शनास आणून देईन, असे ईडीतर्फे सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने मलिक यांच्या याचिकेवरील सुनावणी २१ फेब्रुवारीला ठेवली आहे. ईडीने गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मलिक यांना अटक केली.