Join us  

जुन्या पारंपरिक गाण्यांवर कॉपीराइटचे उल्लंघन होते का?; उच्च न्यायालय घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 1:55 AM

जुन्या गाण्यांचे पुन:सादरीकरण करून कॉपीराइटचे उल्लंघन होते की नाही? तसेच त्याअंतर्गत फौजदारी कारवाई होऊ शकते का? या दोन मुद्द्यांवर उच्च न्यायालय लवकरच निर्णय घेणार आहे.

मुंबई : जुन्या गाण्यांचे पुन:सादरीकरण करून कॉपीराइटचे उल्लंघन होते की नाही? तसेच त्याअंतर्गत फौजदारी कारवाई होऊ शकते का? या दोन मुद्द्यांवर उच्च न्यायालय लवकरच निर्णय घेणार आहे.कॉपीराइटचे उल्लंघन केल्याप्रकरणी गीतकार प्रमोद सूर्या, दोन प्रकाशक पुखराज सूर्या आणि हितेन पटेल यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा रद्द करण्यासाठी या तिघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.याचिकेनुसार, प्रमोद सूर्या यांनी गुजराती आणि मारवाडी समाजात विवाह व अन्य मंगल कार्यात गाण्यात येणारी पारंपरिक गाणी एकत्र करून त्या गाण्यांची दोन पुस्तके प्रकाशित केली. पुखराज सूर्या आणि हितेन पटेल हे त्या पुस्तकांचे प्रकाशक आहेत.डिसेंबर २०१४ मध्ये आशादेवी सोनीगड यांनी मालाड पोलीस ठाण्यात प्रमोद सूर्या, पुखराज सूर्या आणि हितेन पटेल यांच्याविरुद्ध कॉपीराइटचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. तक्रारीनुसार, या तिघांनीही आशादेवी यांनी आधीच एका पुस्तकात छापलेले गाणे त्यांच्या पुस्तकात छापून कॉपीराइटचे उल्लंघन केले.आशादेवी यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने म्हटले की, अशा गाण्यांवर (जुनी पारंपरिक गाणी) कोणी कॉपीराइटचा दावा कसे करू शकते?‘पिढ्यान्पिढ्या विवाह किंवा अन्य मंगल कार्यादरम्यान जुनी पारंपरिक गाणी वाजवली जातात किंवा गायली जातात. त्या गाण्यांवर कोणी कसा कॉपीराइटचा दावा करू शकतो? आपले राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ याचे कोणीही, कुठेही पुन:सादरीकरण करू शकत नाही, असे म्हणण्यासारखे हे आहे,’ असे म्हणत न्यायालयाने पोलिसांना गीतकार व दोन प्रकाशकांविरुद्ध दोषारोपपत्र सादर न करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :न्यायालय