ताई, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?, मनसेनं दाखवला आरसा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 01:29 PM2021-09-30T13:29:59+5:302021-09-30T13:32:22+5:30
राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ खड्डे या राष्ट्रवादीच्या मोहिमेंतर्गत रस्त्यांतील खड्ड्यांसोबत फोटो काढत राज्य सरकारचा निषेध नोंदवला होता.
मुंबई - राज्यासह मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे राज्यभरात पावसाळ्यातील खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या खड्ड्यांची दखल घेत मंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, रस्त्यातील खड्डे ही गंभीर समस्या बनली असून मनसेनं ट्विट करुन राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना जुनी आठवण करुन दिली आहे.
राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ खड्डे या राष्ट्रवादीच्या मोहिमेंतर्गत रस्त्यांतील खड्ड्यांसोबत फोटो काढत राज्य सरकारचा निषेध नोंदवला होता. सध्या राज्यात राष्ट्रवादी सत्तेत असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, सुप्रिया सुळे यांचे ते जुने फोटो व्हायरल होत आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही सुप्रिया सुळेंचा तोच फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. तसेच, ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.
ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?? pic.twitter.com/nwkjr6dX0d
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 30, 2021
अमित ठाकरेंनीही साधला निशाणा
रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अनेकजण जीव धोक्यात घालून प्रवास करतात. खड्ड्यांमुळे काहींनी प्राणही गमावले आहेत. आता पुन्हा एकदा खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल अशा शब्दात मनसे नेते अमित ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेनेवर भाष्य केले आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. पण, जनतेच्या न्यायालयात त्यांना शिक्षा होऊ शकेल असं त्यांनी सांगितले आहे.
कामचुकार कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा
राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र या निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आले तर संबंधित कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे, त्यालाही जबाबदार धरून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती व उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतली होती.