मुख्यमंत्री फडणवीसांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का?, आदित्य ठाकरेंचा सवाल, धडक मोर्चाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:33 IST2025-04-12T16:25:21+5:302025-04-12T16:33:20+5:30
Aaditya Thackeray Devendra Fadnavis Mumbai News: मुंबईतील पाणी पुरवठ्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का?, आदित्य ठाकरेंचा सवाल, धडक मोर्चाचा इशारा
Mumbai Breaking News: "वारंवार लक्ष वेधूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्या समस्येकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. त्यांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का?", असा सवाल शिवसेनेचे (यूबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. मुंबईतील टँकर असोसिएशनचा संप आणि पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यांकडे आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईतील टँकर असोसिएशनने केंद्र सरकारचे नियम आणि मुंबई महापालिकेच्या नोटिशी मिळाल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला. १० एप्रिलपासून मुंबईतील टँकर असोसिएशनने संप पुकारला असून, शनिवारपर्यंत त्यावर तोडगा निघू शकला नाही.
वाचा >>टँकर कोंडीमुळे काही भागांतील नागरिकांचे पाण्याअभावी हाल
याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. आमदार ठाकरे म्हणाले, "दूषित पाणी, कमी दाबाने येणारं पाणी, अघोषित पाणी कपात अश्या पाण्याच्या अनेक समस्यांनी मुंबईकर गेले काही महिने हैराण आहेत. त्यातच पाणी टॅंकर्सचा संप सुरु झाल्याने मुंबईत अधिकच अडचणी निर्माण झाल्या आहेत."
ठाकरे म्हणाले, 'फडणवीसजी गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत'
टँकर संपाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, "गेल्या आठवड्यात महावीर जयंती, आजची हनुमान जयंती, येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे मोठे राष्ट्रीय सण सुरु असताना मुंबईकरांना ह्या समस्येला सामोरं जावं लागतंय. पण वारंवार लक्ष वेधूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्या समस्येकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. त्यांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का? असा प्रश्न पडतोय", अशी टीका ठाकरेंनी फडणवीसांवर केली आहे.
वार्ड अधिकाऱ्यांना जाब विचारणार
"मुंबईकर म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही! पुढच्या ४८ तासात जर हा प्रश्न सुटला नाही, तर शिवसैनिक आणि मुंबईकर मुंबईतल्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर धडक मोर्चा घेऊन जाणार आणि 'वॉर्ड ऑफिसर' ना जाब विचारणार", असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
दूषित पाणी, कमी दाबाने येणारं पाणी, अघोषित पाणी कपात अश्या पाण्याच्या अनेक समस्यांनी मुंबईकर गेले काही महिने हैराण आहेत.
त्यातच पाणी टॅंकर्सचा संप सुरु झाल्याने मुंबईत अधिकच अडचणी निर्माण झाल्या आहेत.
गेल्या आठवड्यात महावीर जयंती, आजची हनुमान जयंती, येणारी डॉ. बाबासाहेब…— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 12, 2025
मुंबईतील टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासकांना मध्यम मार्गाने तोडगा काढण्याचे निर्देश दिले. शुक्रवारी (११ एप्रिल) मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले, पण शनिवारीही संप मिटू शकला नाही.