Join us  

'मुख्यमंत्री पदाची अन् राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असं वाटत नाही का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 2:10 PM

एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एनआयएने अटक केली आहे. एनआयएकडून  सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर भाजपा आक्रमक झाली असून सचिन वाझेंची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. तर, दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. 

एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असे त्यांना वाटत नाही का? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यात येत आहे. भाजपा नेते मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येतात.   

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वाझे यांचा बचाव का केला? हे समजण्यापलीकडचे आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो आणि नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो, परंतु येथे उद्योगपतींच्या घातपाताची व समाजातील शांतता भंग करणाऱ्यांचे शिवसेना समर्थन करत होती. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्याची उत्तरे महाराष्ट्राची जनताही शोधत आहे. वाझे यांचे समर्थन का केले जात होते? कोणते मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना या संपूर्ण घटनेची कल्पना होती आणि तरीही त्यांनी मौन बाळगले? कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना हे सर्व माहित होते आणि तरीही त्यांनी मौन बाळगले?, असे अनेक प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

तसेच, हे केवळ हत्येचे प्रकरण नाही, तर हा देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट होता. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी संशयास्पदरित्या सहभागी होता. पण जनतेला महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस आणि एनआयएवर पूर्ण विश्वास आहे आणि ते याप्रकरणाचा तपास करुन खऱ्या सूत्रधाराला अटक करुन या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करतील, अशी आशा असल्याचेही पाटील यांनी आपल्या फेसुबक पोस्टवरुन सांगितलं. 

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा 

"अखेर सचिन वाझेंना अटक झाली. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील ओसामा बीन लादेनला अटक झाली आहे. या सचिन वाझे आणि त्याच्या गँगला पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा घ्यायला पाहिजे. ज्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत सचिन वाझे ओसामा बीन लादेन आहे का हा जो शब्द वापरला होता. त्या मुख्यमंत्र्यांनी देखील नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे ही स्पष्ट मागणी आहे" असं प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.

टॅग्स :चंद्रकांत पाटीलमुख्यमंत्रीसचिन वाझे