लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ओशिवरा येथे आपल्या मित्रांसोबत सोसायटीत खेळत असताना चित्रपट निर्मात्याच्या १४ वर्षीय मुलावर श्वानाने हल्ला केला. त्यात त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, श्वानाच्या मालकाने मुलांना आधी कंपाऊंडमध्ये खेळू नका अशी धमकी दिली आणि ते खेळत असताना त्याने त्याला सोडले.
सदर चित्रपट निर्मात्याचे नाव केतन सुरेश गुप्ता (४५) असे असुन ते ओशिवरा येथील सेकंड क्रॉस रोडच्या ब्राइटन टॉवर येथे राहतात. श्वानाने त्यांचा मुलगा सिद्धांत (१४) याच्या दोन्ही पायाला चावा घेतला. त्यात दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओशिवरा पोलिसांनी सोसायटी कंपाऊंड येथील बंगल्यात राहणाऱ्या कुत्र्याचा मालक राज सहाबाजी याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. या श्वानाने लहान मुलांना चावल्याची वर्षभरातील ही तिसरी घटना असल्याचा दावा सोसायटी सदस्यांनी केला. गुप्ता यांनी पत्रकाराला दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचा मुलगा सोसायटीच्या आवारात इतर किशोरवयीन मुलांसोबत खेळत असताना श्वानाचा मालक साहबाजी तेथे आला. त्यानंतर त्याने माझ्या मुलाला आणि इतर किशोरवयीन मुलांना या भागात खेळू नका असे सांगितले. काही मिनिटानंतर शाहबाजीने त्याचा श्वान मुलांवर सोडला. ज्यात मुलगा सिद्धांत याच्या दोन्ही पायांना त्याने क्रूरपणे चावा घेतला. मी त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले आणि उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले."
ब्राइटन टॉवरमध्ये याच श्वानाने किशोरवयीन मुलांना चावल्याची ही तिसरी घटना असून श्वानाचा मालक सहाबाजी याच्या विरोधात नोंदलेली ही दुसरी एफआयआर आहे.गुप्ता पुढे म्हणाले की, त्यात श्वानाचा दोष नाही. त्याचा मालक ज्याने रस्त्यावरचा श्वान पाळला आहे मात्र त्या प्राण्याला सांभाळण्याची क्षमता त्याच्यात नाही. तो त्याला दिवसभर बांधून ठेवतो. त्यामुळे त्याला प्रशिक्षण किंवा सामाजिकीकरण मिळत नाही आणि तो आक्रमक बनला आहे. ब्राइटन टॉवरमध्ये एकच व्यक्ती आणि त्याच्या पाळीव प्राण्यासोबतची ही तिसरी घटना आहे. यामुळे इतर मुले इमारतीच्या कंपाऊंडमध्ये खेळण्याची भीती बाळगतात. गेल्या वर्षी २१ मे रोजी ही अशीच घटना घडली होती आणि त्याच व्यक्तीविरुद्ध एफआयआरही नोंदविण्यात आला. या प्रकरणी अद्याप अटक करण्यात आले नसून तपास सुरू असल्याचे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"