विक्रोळीत श्वानाच्या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अडीच तास ग्रेट डेन तोडत होता लचके

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 02:13 PM2024-08-29T14:13:53+5:302024-08-29T14:25:59+5:30

मुंबईत श्वानाच्या हल्ल्यात एका श्वान सांभाळणाऱ्या तरुणाचा धक्कादायकरित्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Dog fatally attacked a young man who was training dogs in Vikhroli area | विक्रोळीत श्वानाच्या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अडीच तास ग्रेट डेन तोडत होता लचके

विक्रोळीत श्वानाच्या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अडीच तास ग्रेट डेन तोडत होता लचके

Mumbai Dog Attack : गेल्या काही  दिवसांपासून देशभरात श्वानांच्या हल्ल्यांच्या प्रकरणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू देखील झालाय. अशातच मुंबईतही एका तरुणाच्या श्वानाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईच्या विक्रोळी परिसरात श्वानांना सांभाळणाऱ्या तरुणावरच एका श्वानाने जीवघेणा हल्ला केला. तब्बल अडीच तास हा श्वान तरुणाचे लचके तोडत होता. पोलीस, श्वान पथकालाही ग्रेट डेन जातीचा हा श्वान आवरला नाही आणि शेवटी तरुणाने आपले प्राण सोडले. या सगळ्या प्रकारानंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

सोमवारी सकाळी मुंबईतील विक्रोळी येथील गोदरेज कंपाऊंडमध्ये असलेल्या मार्शल डॉग या श्वान प्रशिक्षण कंपनीत प्रशिक्षण सत्रादरम्यान हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. इथल्या २२ वर्षीय श्वान सांभाळणारा तरुण हसरत अलीवर ग्रेट डेन जातीच्या श्वानाने केलेल्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. टागोर नगर, विक्रोळी येथील रहिवासी असलेल्या अलीचा घटनेच्या काही तासांतच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी मार्शल डॉगचे मालक आणि कंपनीशी संबंधित इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४ अ नुसार एफआयआर दाखल केला आहे.
 
विक्रोळीच्या गोदरेज कंपनीमध्ये मार्शल डॉग एजन्सी या कंपनीमार्फत श्वान सुरक्षा पुरवण्यात येते. या श्वानांना कंपनीच्या आवारात घेऊन फिरण्याचे काम हसरत अली बरकत अली शेख हा करत होता. हसरत अलीकडे ग्रेट डेन या जातीच्या श्वानाला घेऊन फिरण्याची जबाबदारी होती. मात्र सोमवारी सकाळी या श्वानाने हसरतवर अचानक जीवघेणा हल्ला केला.  घटनेची माहिती मिळताच पोलीस , पालिकेचे श्वान पथक आणि काही प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झाले. या श्वानाला हसरत अली पासून लांब करण्याचा ते प्रयत्न करत होते. तब्बल अडीच तास श्वानाचा हसरत अलीवर हल्ला सुरुच होता. 

तीन तासांनी हसरत अलीला श्वानाच्या तावडीतून सोडवण्यात यश आलं. त्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गंभीर जखमा झाल्याने हसरत अलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हसरत अलीच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. मात्र कुटुंबियांना कंपनीने दिलेल्या माहितीवर विश्वास बसत नाहीये. हसरत अलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्याने आठ महिन्यांपूर्वी मार्शल डॉगमध्ये नोकरी मिळवली होती. अली त्याच्या नोकरीच्या संपूर्ण कालावधीत ग्रेट डेनसोबत काम करत होता आणि त्या श्वानासोबत परिचित होता. अलीच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूच्या संशय व्यक्त केला आहे.

Web Title: Dog fatally attacked a young man who was training dogs in Vikhroli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.