Join us

कुत्र्याची चूक, मालकाला 3 महिने कारावास; दंडाधिकारी न्यायालयाने १३ वर्षांनी दिला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 6:32 AM

होर्मसजी यांना श्वानाच्या आक्रमक स्वभावाची माहिती होती. असे असूनही त्यांनी भुंकणाऱ्या व रागावलेल्या श्वानाला कार बाहेर येऊ दिले.

मुंबई : अनेक जण पाळलेल्या श्वानाची पोटच्या गोळ्याप्रमाणे काळजी घेतात. मात्र, हेच श्वान जेव्हा आक्रमक होऊन इतरांना इजा पोहोचवतात त्यावेळी श्वानमालकाला शिक्षा ठोठावणे क्रमप्राप्त ठरते. अशाच एका घटनेत एका श्वानमालकाला तीन महिन्यांच्या कारवावासाची शिक्षा झाली आहे, तीही तब्बल १३ वर्षांनंतर... 

नेपियन सी मार्गावर राहणाऱ्या सायरस होर्मसजी यांच्याकडे रॉटवायलर आणि लॅब्रेडोर या जातीचे दोन श्वान होते. त्यांचा ७२ वर्षीय केर्सी इराणी यांच्याशी संपत्तीच्या मुद्द्यावरून वाद होता. ३० मे २०१० रोजी होर्मसजी त्याच निमित्ताने इराणी यांच्या घरी गेले होते. जाताना कारमध्ये दोन्ही श्वानांना ते घेऊन गेले. होर्मसजी आणि इराणी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यावेळी रॉटवायलर जातीच्या श्वानाने भुंकण्यास सुरुवात केली. त्याच्या रागीट स्वभावाची जाणीव असतानाही होर्मसजी यांनी कारचा दरवाजा उघडला. त्याने थेट इराणींवर हल्ला चढवला. त्यांच्या पायाच्या पोटऱ्या आणि दंडाला ताे चावला. याप्रकरणी इराणी यांनी तक्रार नाेंदविली हाेती.

काय म्हणाले दंडाधिकारी?- होर्मसजी यांना श्वानाच्या आक्रमक स्वभावाची माहिती होती. असे असूनही त्यांनी भुंकणाऱ्या व रागावलेल्या श्वानाला कार बाहेर येऊ दिले.- अशा प्रकारच्या आक्रमक श्वानाला सार्वजनिक ठिकाणी नेताना इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे, हे श्वानमालकाचे कर्तव्य आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा जिथे प्रश्न आहे, तिथे दया दाखविणे अनावश्यक आहे.

कुत्र्याने चावा घेतल्याने मालकावर गुन्हानांदुरा (जि.बुलढाणा) :  गोठ्यात पाळलेल्या पाळीव कुत्र्याने एकाच्या पायाला चावा घेतल्याची घटना धानोरा खुर्द शेतशिवारात घडली. याप्रकरणी अंबादास अर्जुन डाबेराव (५२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गावातील नारायण डाबेराव याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेतात जात असताना आरोपीच्या शेताजवळ अंबादास यांनी दुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी नारायण यांचा कुत्रा त्यांना चावला. 

दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणी सोमवारी निकाल दिला. होर्मसजी यांच्या वकिलाने दंडाधिकाऱ्यांकडे आपल्या अशिलास दया दाखवावी, अशी याचना केली. मात्र, दंडाधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली. दंडाधिकारी नदीम पटेल यांनी होर्मसजी यांना तीन महिन्यांचा कारावास ठोठावला.

टॅग्स :कुत्रान्यायालयतुरुंग