श्वानप्रेमावर अंकुश

By admin | Published: November 19, 2014 03:57 AM2014-11-19T03:57:32+5:302014-11-19T03:57:32+5:30

श्वान पाळण्यासाठी महापालिकेची अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक असते. नवी मुंबईत मात्र श्वानधारकांनी या नियमाला सपशेल केराची टोपली दाखविली आहे

Dog swing | श्वानप्रेमावर अंकुश

श्वानप्रेमावर अंकुश

Next

कमलाकर कांबळे, नवी मुंबई
श्वान पाळण्यासाठी महापालिकेची अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक असते. नवी मुंबईत मात्र श्वानधारकांनी या नियमाला सपशेल केराची टोपली दाखविली आहे. कायदा व नियमाचा धाकच राहिला नसल्याने सायबर सिटीत विनापरवाना श्वान पाळण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. यासंदर्भात कठोर भूमिका घेत विनापरवाना कुत्रे पाळणाऱ्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.
सन २0१२ मध्ये झालेल्या पंचवार्षिक पशुधन गणनेतील अहवालानुसार नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ३११0 पाळीव कुत्र्यांची नोंद झाली होती. मागील दोन वर्षात यापैकी फक्त २४२ श्वानधारकांनी महापालिकेकडून रीतसर परवाना घेतल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ जवळपास २८६८ कुत्रे विनापरवाना पाळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात परवाने देण्याचे काम वॉर्ड कार्यालयामार्फत केले जाते. मात्र वॉर्ड कार्यालयात नवीन परवाने आणि त्याच्या नूतनीकरणासाठी येणाऱ्या श्वानधारकांचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून आले आहे.
मागील काही वर्षांत नवी मुंबईत उच्चभ्रू संस्कृतीला भुरळ घालणारे उंंच उंच टॉवर्स उभारले आहेत. या टॉवर्समधून राहणाऱ्या वर्गाची जीवनशैली आधुनिक पध्दतीची आहे. या पध्दतीत घरात एखादा कुत्रा पाळणे प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यानुसार टॉवर्समधील एकूण घरांपैकी किमान पाच टक्के फ्लॅट मालकांकडे पाळीव श्वान असल्याचे दिसून आले आहे. उच्चभ्रूच नव्हे, तर मध्यमवर्गीय कुटुंबातही कुत्र्याचे छोटेसे पिल्लू आणून पाळले जाते. ही वस्तुस्थिती असताना महापालिकेच्या दप्तरी या पाळीव कुत्र्यांची नोंद का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाळीव कुत्र्यांना परवाने देण्यासाठी महापालिकेची सक्षम यंत्रणा आवश्यक असताना नवी मुंबईत मात्र उदासीनता आहे. विनापरवाना कुत्रे पाळणाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Dog swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.